राज्यातील रस्त्यांच्या खड्डेमुक्त व दर्जेदार रस्ते देखभाल-दुरुस्ती कामांसाठी १२९६.०५ कोटींचा निधी ; तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ₹५९.७५ कोटी
xtreme2day
23-09-2025 18:22:25
173404747
राज्यातील रस्त्यांच्या खड्डेमुक्त व दर्जेदार रस्ते देखभाल-दुरुस्ती कामांसाठी १२९६.०५ कोटींचा निधी ; तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ₹५९.७५ कोटी

मुंबई, (मंत्रालय प्रतिनिधी) - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक रस्त्यांची स्थिती खराब झाली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ या कालावधीसाठी ₹१२९६.०५ कोटी आणि तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी (माजी राज्य महामार्ग ५५) किमी ०/०० ते किमी ५४/०० या मार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी एकूण ₹५९.७५ कोटी निधीस मंजुरी दिली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री भोसले म्हणाले की, रस्ते हे राज्याच्या प्रगतीचे प्राणवाहिन्या आहेत. सुरक्षित, दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते निर्माण करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. या निधीच्या मंजुरीमुळे तातडीची दुरुस्ती कामे तर होणारच आहेत, शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या कामांमध्ये पारदर्शकता आणली जाणार आहे. तसेच वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेमुळे पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल. खड्डेमुक्त, सुरक्षित आणि टिकाऊ रस्ते उपलब्ध होतील. प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होईल. अपघातांची शक्यता कमी होईल. रस्त्यांच्या आजूबाजूला हरित पट्टा तयार होऊन पर्यावरण संतुलन राखले जाईल.
डिजिटल साधनांमुळे कामांवर प्रभावी नियंत्रण मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
या निधीच्या मंजुरीमुळे राज्यातील रस्त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. खड्डे भरणे, तातडीची दुरुस्ती, पावसामुळे बाधित झालेल्या मार्गांची दुरुस्ती, तसेच पूरक कामे हाती घेण्यासाठी ही रक्कम उपयोगात आणली जाणार आहे. AMC (Annual Maintenance Contract) अंतर्गत ४३,०४३.०६ किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे टप्प्याटप्प्याने भरले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सुस्थितीतील रस्त्यावरुन सुरक्षित प्रवास करणे सोईस्कर होईल.
राज्यातील एकूण आठ प्रादेशिक विभागांखाली येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमधील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. केवळ दुरुस्तीच नव्हे तर कामांची गुणवत्ता तपासणे आणि मानक पद्धतींचे पालन होणे यावरही सरकारकडून काटेकोर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
रस्त्यांची दुरुस्ती वेळेत व दर्जेदार व्हावी यासाठी शासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर AI आधारित अँप विकसित करण्यात आले असून याच्या मदतीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे स्थान, दुरुस्तीची स्थिती, तसेच कामांची वास्तविक वेळेत तपासणी करणे शक्य होणार आहे. या अँपच्या माध्यमातून पारदर्शकता वाढून नागरिकांनाही कामांच्या प्रगतीची माहिती उपलब्ध होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुतर्फा व दुभाजकांवर, तसेच शासकीय इमारतींच्या सभोवताल वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यावर्षीपासून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विशेषतः “वृक्ष लागवड व देखभाल प्रणाली अॅप” विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने वृक्ष लागवडीचे संनियंत्रण अचूकपणे करता येणार असून, वृक्ष संगोपनाची अद्ययावत माहिती शासनाला तात्काळ उपलब्ध होईल. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच रस्त्यांच्या सौंदर्यवृद्धीलाही हातभार लावणार आहे.
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ₹५९.७५ कोटी निधीस मान्यता
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी (माजी राज्य महामार्ग ५५) किमी ०/०० ते किमी ५४/०० या मार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी एकूण ₹५९.७५ कोटी निधीस मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिली आहे. तसेच या निर्णयामुळे तळेगाव–चाकण–शिक्रापुर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचा धोका टळेल तसेच औद्योगिक वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री भोसले यांनी सांगितले.
तळेगांव-चाकण-शिक्रापूर या मार्गात तळेगांव ते चाकण दरम्यान चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता व चाकण ते शिक्रापूर दरम्यान सहा पदरी रस्ता या कामाचा समावेश आहे. हे संपूर्ण काम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बी.ओ.टी.) तत्वावर बांधण्यात येणार आहे.
या मार्गाचा समावेश पूर्वी राज्य रस्ते विकास आराखडा २००१–२०२१ अंतर्गत करण्यात आला होता. त्यानंतर भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी असा दर्जा दिला असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) तो महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे (MSIDC) हस्तांतरित करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत तळेगाव–चाकण–शिक्रापुर हा महामार्ग अतिवृष्टीमुळे खचला असून, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व रुंदीकरण आवश्यक झाले होते. हा मार्ग औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा असल्यामुळे येथे आवजड वाहतुकीची मोठी वर्दळ असते. परिणामी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि रस्ता सुरक्षेच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. हा महामार्ग परिसरातील मुख्य रस्त्यांना जोडणारा एकमेव महत्त्वाचा रस्ता असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुरुस्तीची मागणी होत होती.
यासंदर्भात दिनांक ३० जुलै २०२५ रोजी पुणे जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शासनस्तरावर पाठपुरावा करून आता आवश्यक निधीस मान्यता देण्यात आली आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.