xtreme2day 02-09-2025 21:16:57 95303728
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा”चा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार ; स्पर्धा व पोर्टलला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे, दि. २ सप्टेंबर : (जिमाका वृत्तसेवा) : राज्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवास २०२५ पासून राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्य महा उत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा”चा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा व राज्यस्तरांसोबतच तालुकास्तरीय पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रभरातील तब्बल ४०४ मंडळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला असून स्पर्धेचे परीक्षण सहभागी तालुक्यांत सुरू आहे. राज्योत्सवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरलेले घरगुती व सार्वजनिक गणपती बाप्पांचे छायाचित्र अपलोड करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल देखील लोकांसाठी व मंडळांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. या पोर्टलवरून भाविक मोठ्या संख्येने आपल्या गणपती बाप्पांची छायाचित्रे अपलोड करत असून आजवर २०० हून अधिक घरगुती व ७० हून अधिक सार्वजनिक मंडळांचे छायाचित्रे अपलोड करण्यात आली आहेत. यामुळे घरबसल्या घरोघरीच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे दर्शन गणेशभक्तांना शक्य झाले आहे. तसेच, महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिरे व सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे थेट दर्शन एकाच पोर्टलवर जगभरातील गणेशभक्तांना उपलब्ध होत आहे. मुंबईचा लालबागचा राजा, मुंबईचा राजा, खेतवाडीचा गणराज, पुण्याचा दगडूशेठ हलवाई, श्री सिद्धिविनायक मंदिर, अष्टविनायक आणि टिटवाळ्याच्या गणपतीचे दर्शन एका क्लिकवर शक्य झाले आहे. या दोन्ही पोर्टलमुळे जगभरातील गणेशभक्तांना राज्यातील विविध जिल्ह्यांतील व शहरांतील गणेशमूर्तींचे दर्शन घेणे अतिशय सुलभ झाले आहे. या उदंड प्रतिसादाबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी भाविकांचे आभार मानले असून अधिकाधिक मंडळे व नागरिकांनी त्वरित ganeshotsav.pldmak.co.in या पोर्टलवर छायाचित्रे पाठवून राज्य महा उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.