विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासह संस्कृतीशी नाळ जोडलेला राहील या दृष्टीने पाठ्यपुस्तकांची निर्मिती करावी- दादाजी भुसे
xtreme2day
22-08-2025 21:54:39
108335698
विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासह संस्कृतीशी नाळ जोडलेला राहील या दृष्टीने पाठ्यपुस्तकांची निर्मिती करावी- दादाजी भुसे

पुणे (प्रतिनिधी) - प्रत्येक विद्यार्थी जीवनात यशस्वी, स्वावलंबी व स्वतःच्या पायावर उभा राहण्यासह तो आपल्या मातीशी, संस्कृतीशी नाळ जोडलेला राहील यादृष्टीने पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी बालभारतीने प्रयत्न करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. विद्यार्थी हा भारतीय राष्ट्रीय विचारांचा व्हावा अशी व्यवस्था नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित अंमलबजावणी करावयाच्या शिक्षण व्यवस्थेत व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्यावतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित पाठ्यपुस्तक निर्मिती उद्बोधन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रनजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, पाठ्यपुस्तक निर्मिती सुकाणू समिती सदस्य श्रीपाद ढेकणे, शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, महेश पालकर, शरद गोसावी, पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या संचालक अनुराधा ओक आदी उपस्थित होते.
बालभारतीमुळे महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीकडे एक आकर्षण म्हणून देशभरात पाहिले जाते असे सांगून शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, आत्ताच्या काळात बालकांचे लक्ष विचलित करणारे मोबाईल, टीव्ही, ई-माध्यमे तसेच येणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचे आपल्यासमोर आव्हान असून या साधनांऐवजी वाचण्यासाठी लक्ष वेधून घेणारी आकर्षक आणि आधुनिक पुस्तके बालभारतीने निर्माण करण्याची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या लढायांना जितके पुस्तकांमध्ये महत्त्व मिळते तितकेच त्यांनी केलेला राज्यकारभार त्यांच्या इतर कौशल्यपूर्ण गुणांनाही पाठ्यपुस्तकांमध्ये स्थान मिळण्याची आवश्यकता आहे. त्यासोबतच राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी अनेक महान व्यक्तिमत्वे देशात होऊन गेली. त्यांना मानाचे स्थान पाठ्यपुस्तकांत मिळाले पाहिजे. क्रांतिकारकांचा लढ्याला पुस्तकांमध्ये स्थान दिल्यास त्यापासून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल.
शालेय शिक्षणात सैनिकी प्रशिक्षणाचा समावेश करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून या माध्यमातून भारताचा संस्कारक्षम नागरिक कसा घडेल या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल. कृषी, पर्यावरण, परिवहन नियम, सामाजिक समस्या, व्यसनमुक्ती आदी विषयांचाही अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत विचार करावा. विषय शिक्षकांनी जिल्हा स्तरावरील इतिहास विषयाचा अभ्यासक्रम तयार करताना त्या त्या तालुका, जिल्ह्यातील प्रमुख व्यक्तींचा, समाजसुधारक, संतांचादेखील समावेश करता येईल का याचा विचार करावा, असेही शिक्षणमंत्र्यांनी नमूद केले.
प्रधान सचिव श्री. देओल म्हणाले, या कार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार 'एनसीईआरटी'ची पुस्तके तयार केलेल्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. मुलांना मोबाईलपासून पुस्तकांकडे, अभ्यासाकडे कसे आणता येईल यादृष्टीने आपली पुस्तके ही मोबाईपेक्षा कशी चित्तवेधक होतील यादृष्टीने प्रयत्न करावयाचे आहेत. आत्ताच्या काळाशी सुसंगत नवीन बाबी, नवीन मूल्यांचा पुस्तकांमध्ये समावेश करायचा आहे. अभ्यासक्रमातून केवळ माहिती मिळण्यापेक्षा विश्लेषणात्मक विचारसरणीला, निर्णायक, वास्तववादी विचारसरणीला चालना कशी मिळेल यावर भर द्यायचा आहे. मुले आणि शिक्षकांचा परस्परांशी आणि मुलांचा व शिक्षकांचा समाजाशी कसा सुसंवाद निर्माण होईल या दृष्टीने ही पुस्तके उपयुक्त ठरतील अशी निर्माण करण्यात यावीत, असेही ते म्हणाले.
शिक्षण आयुक्त श्री. सिंह म्हणाले, पाठ्यपुस्तक उत्कृष्ट आहे का हे ते मुलांना आवडते का यावर अवलंबून आहे. बालकांचे लक्ष आकर्षित व्हावे यादृष्टीने सृजनता, नवीनता, कल्पकता या बाबी पुस्तकात आणाव्या लागणार आहेत. पुढील एकाच वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पुस्तके तयार करून बालकांपर्यंत पोहोचविण्यात येतील. तयार करण्यात येणारी पुस्तके पुढील दोन- तीन दशकांसाठी पाया असतील यादृष्टीने प्रयत्न करावयाचे आहेत. ही पुस्तके आणि अभ्यासक्रम पूर्ण महाराष्ट्राचे, समाजाचे परिवर्तन घडवून आणण्याचे मुख्य साधन बनू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. रेखावार म्हणाले, येणाऱ्या पिढीचा पाया भक्कम होईल याची खात्री होण्यासाठी पाठ्यपुस्तके उत्कृष्ट बनविण्यात यावीत या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी देशभरातून शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची ऑनलाईन व्याख्याने, एनसीईआरटीचे विविध विभागांचे प्रमुख, शालेय अभ्यासातील विविध विषयांचे प्राध्यापक, अभ्यासक आदींचे मार्गदर्शन होणार आहे.
यावेळी श्री. ढेकणे यांनीही मार्गदर्शन केले. श्रीमती ओक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सन 2025-26 च्या शैक्षणिक दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले.या दोन दिवसीय कार्यशाळेला शिक्षण तज्ज्ञ, पाठ्यपुस्तक निर्मितीतील तज्ज्ञ, राज्यभरातून आलेले विषय शिक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.