Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट ! ताम्हिणी, आंबोली, कोकणातील घाट परिसरात प्रचंड पाऊस ; राज्यातही पूरपरिस्थिती गंभीर

xtreme2day   21-08-2025 20:02:21   38644961

संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट ! ताम्हिणी, आंबोली, कोकणातील घाट परिसरात प्रचंड पाऊस ; राज्यातही पूरपरिस्थिती गंभीर 

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - राज्यात गेल्या आठवडा भरापासून पावसानं थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे  अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे घाट परिसरात पुढील 24 तासांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सचेत या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मागील सात दिवसांत 253.74 कोटी नागरिकांना हवामानाचे अलर्ट संदेश पाठवण्यात आले आहेत. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

मुंबईपासून ठाण्यापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. इतकंच नव्हे तर, मुसळधार पावसामुळे रस्ते आणि घरांमध्ये साचलेल्या पाण्यात साप तरंगताना दिसत आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीतील दैघर गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात साप तरंगताना दिसले, ज्यामुळे स्थानिक लोक भयभीत झाले आहेत. पावसाळ्यामुळे आजूबाजूच्या जंगलातून साप रहिवासी भागामध्ये आले आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

 

राज्यातील अनेक नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या खुणेच्या वर गेली आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पूरस्थिती कायम आहे. मोठ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 

 

नाशिक परिसरात प्रचंड पावसामुळे गंगापूर धरणातून 7945 क्युसेस विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नाशिक शहरात गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. नंदुरबार धुळे आणि जळगाव परिसरातील नद्यांनी रौद्ररूप धारण केलेले आहे. उत्तर महाराष्ट्र प्रमाणेच विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला या जिल्ह्यातील नद्याही उफणल्या आहेत.

 

 

कोकणात रत्नागिरीतील जगबुडी, रायगडमधील अंबा आणि ठाण्यातील काळू नदी इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत

 

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचीही स्थिती गंभीर आहे.  सातारा जिल्ह्यात प्रचंड पाऊस होत असल्यामुळे नद्याना आले दुथडी भरून वाहत आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ, खेड, नारायणगाव आणि आंबेगाव तालुक्यात दरड कोसळण्याची शक्यता असल्याने काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तामिनी घाटामध्ये सुमारे 535 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. तसेच, घोडनदीत अडकलेल्या पाच व्यक्तींना 'आपदा मित्र' दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 

 

 

पश्चिम महाराष्ट्रातही पूरस्थिती कायम आहे. अलमट्टी धरणाच्या विसर्गावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. कृष्णा नदीची पातळी वाढल्याने सांगलीतील आयर्विन पूल येथे धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर, उजणी धरण पूर्ण भरल्याने भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून, वाहतुकीसाठी काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी वाढली आहे तर इकडे कोयना धरण परिसरात प्रचंड पाऊस असल्याने कोयनातून झालेल्या विसर्गामुळे सांगली शहर आणि परिसरात भीमा नदीची पातळी वाढली आहे.

 

दरम्यान, राज्याच्या किनारपट्टी भागातही समुद्राने रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) ठाणे, पालघर, रायगड, आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उंच लाटांचा इशारा दिला आहे. या काळात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती