xtreme2day 21-08-2025 19:53:30 4984601
अमेरिकेने निर्माण केलेल्या आव्हानांना न घाबरता केंद्र सरकारच्या नीतीने मुकाबला - देवेंद्र फडणवीस मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या मालावर टॅरिफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिकेने निर्माण केलेल्या आव्हानांना न घाबरता आपली पावले टाकत आहे. आपल्या मालासाठी पर्यायी बाजारपेठ शोधून अमेरिकेने लादलेल्या टॅरिफ आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जागतिक आयात-निर्यात धोरणाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या आपत्तीला संधी मानून राज्याच्या 'इज ऑफ डूईंग बिझनेस'मध्ये जास्तीत जास्त बदल करण्यात यावेत. 'इज ऑफ डूइंग बिजनेस' धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र 'वॉर रूम'ची निर्मिती करण्याचे असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सल्लागार (निवृत्त) अपूर्व चंद्रा, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी गुप्ता यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.