नव्या मंत्रिमंडळात स्वच्छ, निष्कलंक चेहरे असावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही ; अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार
xtreme2day
10-12-2024 22:37:10
5675088
नव्या मंत्रिमंडळात स्वच्छ, निष्कलंक चेहरे असावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही ; अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार
मुबंई (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील नव्या मंत्रिमंडळात स्वच्छ, निष्कलंक चेहरे असावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांचा पत्ता कापला जाणार आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल. शिवसेनेच्या पाच नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. यातील चार जण गेल्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यापासून त्यांच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. टीम फडणवीस जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या ९६ तासांत टीम फडणवीस शपथ घेण्याची शक्यता आहे. फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांचा समावेश कऱणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. गेल्या पाच वर्षांत ज्या आमदारांची सार्वजनिक जिवनात कामगिरी सरस राहिलीये अशा आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. काही ज्येष्ठ नेत्यांना संघटनेत परत पाठवलं जाण्याची शक्यता आहे. फडणवीस सर्व विचार करुन मंत्रिमंडळ सदस्यांची नियुक्ती करतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
येत्या १६ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली आहे. तिन्ही पक्षांची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यामुळे अपेक्षित संख्याबळ मिळवता आलेले नाही. महायुतीने २३७ जागांवर महाविजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला ५० पेक्षाही कमी जागांवर विजय मिळवता आला. आघाडीतील एकाही पक्षाकडे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेले १० टक्के संख्याबळ नाही. विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एका पक्षाने २९ जागा जिंकणे अपेक्षित असते, परंतु विरोधी बाकावरील एकाही पक्षाकडे ते नाही. यातच आता विरोधी पक्षांकडे संख्याबळ नसताना देखील विरोधी पक्षनेते पद दिले जाणार अशी चर्चा सुरु आहे. तर यासाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच देखील सुरु झाली आहे. मात्र यावर आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, 'विरोधी पक्षांमधील आमदारांची संख्या कमी दिसून येत असली तरी देखील त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. सत्तारुढ बाकावर २३७ आमदार आहेत. विरोधी बाकावर ५० सदस्य असून त्यांची संख्या कमी असली तरी मी त्यांना बोलण्याची संधी देणार. त्यांचे विचार, त्यांची मतं प्रकट करण्याची संधी दिली जाणार आहे आणि मी आधीच याची ग्वाही दिली आहे.' तर विधानसभेला विरोधी पक्षानेता मिळणार का? असा प्रश्न विचारला असता नार्वेकर म्हणाले, 'नियमानुसार महाराष्ट्र विधानसभा नियमात ज्या तरतुदी असतील, तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या प्रथा-परंपरेच्या अनुषंगाने मी योग्य तो निर्णय घेणार आहे. यासोबतच राहुल नार्वेकरांनी असेही नमूद केले की, 'विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीत १२ सदस्य असतात. प्रत्येक पक्षाच्या २० सदस्यांपाठी एक असे १२, १३ प्रतिनिधी या समितीत असतात. विरोधकांकडे संख्याबळ नसतानाही आम्ही त्यांचा या समितीत समावेश केला आहे. कारण सभागृहाचं कामकाज योग्यरित्या चालवण्यासाठी सत्तारूढ पक्ष व विरोधकांमध्ये सहकार्य असणं आवश्यक आहे, असं मला वाटतं.' 'येत्या काळात महाराष्ट्र विधानसभेच्या बैठका या अत्यंत नियमाने व योग्यरित्या चालाव्यात. विधानसभेचा एकही मिनिट वाया जाता कामा नये. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेचा प्रत्येक मिनिट सकारात्मक चर्चेसाठी वापरला जायला हवा. त्यासाठीच मी विरोधक व सत्तारूढ पक्षांना बरोबर घेऊन काम करू इच्छितो, हेच माझं ध्येय आहे' असेही नार्वेकरांनी अधोरेखित केले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.