पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ! एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री
xtreme2day
06-12-2024 00:10:26
33549901
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ! एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या नंतरचा तिढा आज सुटला आहे. मुबंईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अनेक राजकीय धुरंधर नेते, उद्योगपती, समाजकारणी, चित्रपट कलाकार आदी यावेळी समारंभ स्थळी उपस्थित होते. याचवेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावना राज्यातील जनतेला सांगितल्या, ते म्हणाले की, माझ्याकडे खूप अनुभव असला तरीही यावेळी मी एक प्रकारचं प्रेशर अनुभवत असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. “मला अनुभव खूप आहे. मागच्या दहा वर्षात मी अडीच वर्ष विरोधी पक्षनेता होतो, पण साडेसात वर्ष मी सरकारमध्ये होतो. मला सरकारचा अनुभवदेखील खूप आहे. पण ज्या प्रकारचे बहुमत यावेळी मिळालं आहे, मला असं वाटतं की त्या बहुमताचं एक प्रेशर, लोकांच्या प्रेमाचे प्रेशर आमच्यावर आहे आणि मी ते अनुभवत आहे. जेव्हा अपेक्षा मोठ्या असतात तेव्हा आव्हान देखील मोठी असतात, कारण लोक तुमच्याकडून अपेक्षा करत असतात, त्यामुळे त्याचं प्रेशर निश्चित माझ्यावर आहे.” असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाइलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधितून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले लाडकी बहीण योजना आम्हीच सुरुच ठेवणार आहोत. तसंच २१०० रुपयेही आम्ही देणार आहोत. आता अर्थसंकल्पात त्याचा विचार आम्ही करु. आपले जे आर्थिक स्रोत चॅनलाईझ्ड झाल्यानंतरच हे करणं शक्य आहे. जी आश्वासनं दिली आहेत ती आश्वासनं पूर्ण करु त्याकरिता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या आम्ही आधी करणार आहोत. स्क्रुटिनी म्हणजेच पडताळणीचा जोपर्यंत प्रश्न आहे त्यात इतकंच आहे की निकषांबाहेर जर कुणी घेतलं असेल किंवा काही तक्रारी आल्या आहेत त्यावर आमचं लक्ष असेल. शेतकरी सन्मान योजना जेव्हा पंतप्रधान मोदींनी सुरु केली तेव्हा पहिल्या टप्प्यात असं कळलं की काही मोठ्या शेतकऱ्यांनाही ते मिळालं आहे. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच सांगितलं की आम्ही निकषात बसत नाही. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत निकषांच्या बाहेरच्या काही बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही.
महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडकी बहीण योजना, पुढील पाच वर्षांतल्या जबाबदाऱ्या यावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपत शत्रूत्व नसेल हेही त्यांनीसांगितलं. त्यावेळी, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही फडणवीसांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.
उद्धव ठाकरेंनी ३१ जुलैच्या दिवशी मुंबईतल्या रंगशारदा या ठिकाणी मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांना जोरदार आव्हानही दिलं. “मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस डाव आखत होते. मात्र मी सगळं काही सहन करुन उभा राहिलो आहे. मी तडफेने उतरलो आहे. आता एक तर तू राहशील किंवा मी राहिन. गीतेमध्येही हेच आहे. अर्जुनाने पाहिलं की त्याच्यासमोर त्याचे नातेवाईकच उभे आहेत तेव्हा त्यालाही यातनाच झाल्या होत्या. मलाही यातना होत नसतील का? पण भाजपा म्हणजे चोर कंपनी आहे.” असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.