महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधीआधी मोठ्या हालचाली घडणार असल्याचे स्पष्ट संकेत !
xtreme2day
03-12-2024 22:49:16
7943267
महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधीआधी मोठ्या हालचाली घडणार असल्याचे स्पष्ट संकेत !
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९ केंद्रीय मंत्री, १९ राज्याचे मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींसह…”; ५ तारखेच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार !
उद्या दि. ४ रोजी भाजप गटनेत्यांच्या निवडीसाठी महत्वाच्या बैठकीनंतर, राज्यपालांकडे महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळाची यादी दिली जाणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भाजपचा उद्या गटनेता निवडला जाणार आहे. त्यासाठी भाजपचे दोन निरीक्षक मुंबईत येत आहेत. यापैकी भाजचे नेते विजय रुपाणी हे मुंबईत दाखल देखील झाले आहेत. तर दुसऱ्या निरीक्षक निर्मला सीतारमण या उद्यापर्यंत मुंबईत दाखल होतील. यानंतर भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. विशेष म्हणजे गटनेता हाच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचा गटनेता निवडल्यानंतर उद्या दुपारी राज्यात खऱ्या अर्थाने सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी उद्या मोठ्या घडामोडी घडणार आहेत. खात्रीलायक सूत्रांनी याबाबत सर्वात महत्त्वाची माहिती दिली.महायुतीचे नेते उद्या दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचे पत्र देणार आहेत. या पत्रातून भाजप नेते राजभवनात राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधीआधी मोठ्या हालचाली घडणार असल्याचे स्पष्ट संकेत आता मिळताना दिसत आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक देखील पार पडली होती. मात्र, या बैठकीनंतरही महायुतीमधील तिढा सुटला नाही अशी चर्चा आहे. यातच एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून आजारी आहेत. तसेच त्यांनी रुग्णालयात दाखल होत उपचार घेतल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आज एकनाथ शिंदे हे वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. वर्षा निवासस्थानी दाखल झाल्यानंतर भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वर्षा निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली.
ऐतिहासिक विजयानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले जाणार आहे. महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ५ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या तयारीला सध्या वेग आला असून आज (३ डिसेंबर) शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर या शपथविधी सोहळ्याला नेमकं कोण-कोण उपस्थित असणार याबद्दल भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. शपथविधी सोहळ्याला कोणते नेते आणि मंत्री उपस्थित राहणार यावर बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, शिवराज सिंह चव्हाण, नितीन गडकरी असे नऊ ते दहा केंद्रीय मंत्री येतील. त्याबरोबरच १९ राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या शपथविधीला येणार आहेत”.
याबरोबरच सर्वधर्मीय गुरूवर्य, साधुसंतदेखील आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाला येणार आहेत. याशिवाय पाच ते दहा हजार लाडक्या बहिणी येतील, त्यांची वेगळी बसण्याची सोय केली आहे. मुंबईतील हाऊसिंग सोसायटींचे चेरमन-सेक्रेटरी असे पाच हजार लोक येतील. कार्यकर्ते आणि दोन ते अडीच हजार शेतकरी वेगवेगळ्या भागातून येणार आहेत . वारकरी, डब्बेवाले येणार आहेत आणि ४० ते ५० हजारांहून कार्यकर्ते सभास्थळी दिसतील”. असेही प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले.
शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीविषयी बोलताना लाड पुढे म्हणाले की, “आझाद मैदान येथे आम्ही ४० हजार खुर्च्यांचा बंदोबस्त केला आहे. त्याव्यतिरिक्त दोन हजार व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींची वेगळी व्यवस्था केली आहे. हा एक अभूतपूर्व सोहळा संपूर्ण देशात पाहायला मिळेल. महाराष्ट्रात जेथे एलईडी स्क्रीन आहेत तेथे हा सोहळा लाईव्ह दाखवला जाईल”.असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रसाद लाड यांना उद्धव ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना लाड म्हणाले, “हा प्रश्न तुम्ही जीएडींच्या सेक्रेटरींना विचारला तर बरं होईल. पण नियमानुसार माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सरकारच आमंत्रित करतं. येणं न येणं… का कोतेपणा दाखवणं हा त्यांचा प्रश्न आहे”, असे उत्तर लाड यांनी दिले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.