वायनाडमध्ये मध्यरात्री भूस्खलन, 71 मृत्यू ; ढिगाऱ्याखाली शेकडो अडकल्याची भीती, लष्कराकडून बचाव कार्य सुरु
xtreme2day
30-07-2024 16:33:44
2784570
वायनाडमध्ये मध्यरात्री भूस्खलन, 71 मृत्यू ; ढिगाऱ्याखाली शेकडो अडकल्याची भीती, लष्कराकडून बचाव कार्य सुरु
वायनाड (एजन्सी वार्ता) - केरळमधील वायनाड जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यरात्री भूस्खलनाच्या घटना घडल्या असून यात 70 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मातीच्या ढीगाऱ्याखाली अनेक जण अडकून पडले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. वायनाडमधील मेपड्डीच्या डोंगराळ भागात हे भूस्खलन झाले आहे. सध्या स्थानिक प्रशासन आणि लष्कराकडून बचाव कार्य राबविले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच तातडीने केरळ सरकारने बचाव कार्य राबावण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री पी विजयन म्हणाले की, बचाव कार्यात सर्व सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकांच्या मते परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्याचबरोबर सततच्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात गुंतलेल्या पथकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी बचाव कार्य वेगाने राबवले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मेपड्डी येथे रात्री दोनच्या सुमारास दरड कोसळण्याची पहिली घटना घडली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, यानंतर पहाटे ४.१० वाजता पुन्हा भूस्खलन झाले. बचाव कार्यासाठी हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक एमआय १७ आणि एलएच ही हेलिकॉप्टर सुलूरला पाठवण्यात आली आहेत. मेपड्डी येथील रुग्णालयात १६ जणांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (KSDMA) सांगितले की, बाधित भागात अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची टीम तैनात करण्यात आली आहे. याशिवाय एनडीआरएफची अतिरिक्त टीम लोकांना वाचवण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर कन्नूर डिफेन्स कॉर्प्सच्या दोन तुकड्यांनाही सूचना देण्यात आल्या असून त्या देखील बचाव कार्य करण्यासाठी रवाना झाल्या आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) केरळच्या मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यांसाठी पुढील ४८ तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. केरळमधील कोल्लम, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, थ्रिसूर आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय ताशी ५० किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. इतर सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.