xtreme2day 27-04-2024 22:50:38 965400
बिहारच्या सारणमध्ये लालूंनी आपल्या मुलीला उतरवले रिंगणात ; रोहिणी आचार्य लढणार प्रतापसिंह रूढी यांच्या विरोधात पाटणा (प्रतिनिधी) - लालूप्रसाद यादव यांना किडनी दान केल्यामुळे काही वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आलेली त्यांची मुलगी रोहिणी आचार्य हिला यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. बिहारमधील सारण लोकसभा मतदारसंघातून ‘आरजेडी’ने त्यांना रिंगणात उतरली आहे. रोहिणी यांच्या विरोधात भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी उभे आहेत. सारणमधूनच पहिल्यांदा लालूप्रसाद खासदार झाले होते. मात्र, या मतदारसंघात गेल्या दोन ‘टर्म’पासून भाजपचा खासदार आहे. सारण हा लालू प्रसाद यादव यांचा कोणे एके काळचा गड मानला जात असे. आता पुन्हा तो गड काबीज कण्यासाठी रोहिणी यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. सारण लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत चार जागांवर ‘आरजेडी’ने विजय मिळवला आहे, तर दोन भाजपच्या ताब्यात आहेत. रोहिणी आचार्य या लालूंचे दुसरे अपत्य असून, मिसा भारती त्यांची मोठी बहीण आहे. रोहिणीनंतर लालूंना चार मुली आहेत. त्यानंतर तेजप्रताप आणि तेजस्वी यांचा क्रमांक लागतो. लालूंचे सर्वांत लहान अपत्य राजलक्ष्मी आहे. लालूंच्या पुढच्या पिढीतील अनेक जण सक्रिय राजकारणात असताना ही मुलगी राजकीय घडामोडींपासून दूरच होती. मात्र, आता यंदा तिलाही रिंगणात उतरविण्याची ‘रिस्क’ राष्ट्रीय जनता दलाने घेतल्याचे राजकीय तज्ज्ञ म्हणतात. रोहिणी यांचा विवाह २४ मे २००२ रोजी समरेशसिंह याच्याशी झाला होता. समरेश सिंगापूरमध्ये आयटी क्षेत्रात काम करतात. लग्नानंतर काही काळापासून रोहिणी आपल्या पतीसोबत सिंगापूरमध्ये राहत होत्या. रोहिणी आणि समरेशसिंह यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. सिंगापूरमध्ये गृहिणी असणाऱ्या रोहिणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘अॅक्टिव्ह’ आहेत. सारण लोकसभा मतदारसंघातील सोनपूर भागात रोहिणी यांच्या स्वागतासाठी झालेली मोठी गर्दी पाहता लालूंना मोठा जनाधार मिळू शकतो, असे काही स्थानिक नागरिकांना वाटते.