उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न
Xtreme Today
21-11-2026 21:58:42
6732011
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न

पुणे (विशेष प्रतिनिधी) - शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे किंवा रोजगाराचे साधन नसून व्यक्तीचे चारित्र्य घडविणारे, नैतिक मुल्यांची जपणूक करणारे आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाजाच्या कल्याणासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या २३ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सिम्बायोसिसचे
संस्थापक व अध्यक्ष डॉ. एस. बी. मुझुमदार, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, वैद्यकीय व आरोग्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर आदी उपस्थित होते.
उपराष्ट्रपती म्हणाले, व्यावसायिक यश महत्त्वाचे असले तरी चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्ये यांना तितकेच महत्त्व आहे. आयुष्यात कितीही मोठे यश मिळविले तरी आपल्या मूल्यांशी तडजोड करू नये. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासावी, आव्हानांना धैर्याने सामोरे जावे आणि प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करावा.
समाजातील गरजू व्यक्तींना मदत करणे, इतरांच्या प्रगतीत हातभार लावणे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करणे यातच खरा आनंद आणि यश सामावलेले आहे. विद्यार्थ्यांनी जगात कुठेही गेले तरी भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचा अभिमान बाळगावा. आपल्या वर्तनातून आणि कार्यातून भारताची प्रतिमा उंचावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून राष्ट्रीय तसेच जागतिक गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे. भारताकडे जगातील सर्वांत मोठी युवा लोकसंख्या असून, या लोकसंख्येचे ज्ञान आणि कौशल्य हे देशाचे मोठे सामर्थ्य आहे, असे ते म्हणाले. उच्च शिक्षणाच्या विस्तारातून देशातील शैक्षणिक संधी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून भारत विविध देशांना सहकार्य करीत असून, ज्ञान आणि कौशल्याची देवाणघेवाण जागतिक कल्याणासाठी महत्त्वाची असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.
सिम्बायोसिस ही केवळ शैक्षणिक संस्था नसून जागतिक समज, शैक्षणिक उत्कृष्टता आणि सर्वसमावेशक शिक्षण यांचा संगम घडविणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विविध देशांतील विद्यार्थी एकाच परिसरात शिक्षण घेत असून, त्यातून आंतरराष्ट्रीय सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्पर आदराची भावना विकसित होत आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ अर्थात संपूर्ण जग एक कुटुंब आहे, हा भारताचा प्राचीन विचार आजच्या जागतिक परिस्थितीतही तितकाच महत्त्वाचा असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.
सिम्बायोसिसच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी १९ हजारांहून अधिक महिला असल्याचा उल्लेख करतांना शिक्षण क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानासोबत मानवी मूल्ये, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी जपणे आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन, जैवतंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञानामुळे जगात वेगाने बदल घडत आहेत. या बदलांचा स्वीकार करताना तंत्रज्ञानासोबत मानवी मूल्ये, नैतिकता, करुणा आणि सामाजिक जबाबदारी जपणे आवश्यक आहे. भविष्यात केवळ तांत्रिक ज्ञान असणाऱ्यांचे नव्हे, तर ज्ञानासोबत विवेक, नवकल्पनांसोबत करुणा आणि महत्त्वाकांक्षेसोबत प्रामाणिकपणा जपणाऱ्यांचे जग असेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
राज्यपाल म्हणाले, भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी विद्यापीठांनी उत्कृष्टता, नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेची केंद्रे बनले पाहिजे. विद्यार्थ्यांना केवळ रोजगारासाठी तयार न करता ज्ञाननिर्मिती करणारे, समस्यांवर उपाय शोधणारे आणि जबाबदार नेतृत्व करणारे नागरिक घडविण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांनी पार पाडावी. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये बहुविद्याशाखीय शिक्षण, कौशल्य विकास, चिकित्सक विचार, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला महत्त्व देण्यात आले आहे.
सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवा, परिसरातील ३५ गावांमध्ये आरोग्य व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक, डॉ. आंबेडकर अध्यासन आणि आफ्रो-एशियन सांस्कृतिक संग्रहालयाच्या माध्यमातून भारतीय बौद्धिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे विद्यापीठाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांसाठी पुणे परिसरात 'ईशान्य भवन' उभारल्याबद्दलही त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले.
पदवीधर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज्यपाल म्हणाले, पदवी हे अंतिम ध्येय नसून आयुष्यभर चालणाऱ्या शिक्षण आणि ज्ञानसाधनेच्या प्रवासाची सुरुवात आहे. विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहावे, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्ये जपावीत, विविधता व सर्वसमावेशकतेचा आदर करावा. समाजातील प्रत्येकाला समान संधी उपलब्ध नसतात. त्यामुळे स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता इतरांसाठीही संधी निर्माण करण्यासाठी करावा. समाज आणि देशाप्रती असलेली जबाबदारी विसरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कुलगुरू डॉ. रमण यांनी विद्यापीठ वार्षिक अहवालाचे वाचन करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
डॉ. येरवडेकर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. सिम्बायोसिसच्या १९७१ मधील छोट्याशा सांस्कृतिक संस्थेपासून आंतरराष्ट्रीय विद्यापीठापर्यंतच्या प्रवासीबाबत त्यांनी आपल्या भाषणातून माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांंना व्यसनमुक्ती बाबत शपथ देण्यात आली.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उत्कृष्ट परदेशी विद्यार्थ्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच १२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. यावेळी विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, प्राचार्य आदी उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.