पुणे जिल्हा परिषदेचे २५ गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट
Xtreme Today
20-11-2026 21:56:09
99062484
पुणे जिल्हा परिषदेचे २५ गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट
२० हजार विद्यार्थ्यांमधून आयुका संस्थेच्या निवड प्रक्रियेद्वारे निवड; २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान अमेरिका शैक्षणिक दौरा
पुणे, दि. २० (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या २५ गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था, विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या उद्देशाने आयोजित आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेले २५ विद्यार्थी २० नोव्हेंबर २०२६ रोजी अमेरिकेसाठी रवाना होणार असून, ७ डिसेंबर २०२६ रोजी भारतात परतणार आहेत.
या २० दिवसांच्या अमेरिका शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी वॉशिंग्टन डी.सी., ऑर्लँडो आणि सॅन फ्रान्सिस्को येथील नामांकित वैज्ञानिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञान संस्थांना भेट देणार आहेत. वॉशिंग्टन डी.सी. येथे स्मिथसोनियन राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालय, राष्ट्रीय हवाई व अंतराळ संग्रहालय आणि स्टीव्हन एफ. उडवार-हॅझी केंद्र यांचा समावेश आहे. ऑर्लँडो येथे नासाचे केनेडी अंतराळ केंद्र, अंतराळवीर प्रशिक्षण केंद्र आणि एम्ब्री-रिडल वैमानिक विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, खगोलशास्त्र आणि अंतराळवीर प्रशिक्षण प्रक्रियेची माहिती मिळणार आहे.
सॅन फ्रान्सिस्को येथे कॅलिफोर्निया विज्ञान अकादमी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला विद्यार्थी भेट देणार आहेत. या भेटींसाठी डॉ. गिरिजा नारळीकर यांचे सहकार्य लाभणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे संशोधन, नवनवीन तंत्रज्ञान आणि उद्योजकतेची ओळख होणार आहे.
या उपक्रमासाठी तब्बल २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागासाठी अर्ज केले होते. आयुका (आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र) या संस्थेच्या तीन टप्प्यांतील निवड प्रक्रियेद्वारे २५ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या दौऱ्याच्या शैक्षणिक लाभासाठी आयुका केंद्रात विशेष पूर्वतयारी आणि मार्गदर्शन करण्यात आले आहे. आयुका येथील एक वैज्ञानिकही या दौऱ्यात सहभागी होणार असून, विविध वैज्ञानिक आणि तांत्रिक संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि प्रत्येक भेटीचा शैक्षणिकदृष्ट्या अधिकाधिक उपयोग करून देणे, ही त्यांची भूमिका असेल.
या उपक्रमाचा विस्तार केवळ अमेरिकेतील शैक्षणिक दौऱ्यापुरता मर्यादित नसून, ग्रामीण विद्यार्थ्यांना देशातील विविध भागांतील संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक जीवनाची ओळख करून देण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून यंदा ५० विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनाला भेट दिली आहे. तसेच ५० विद्यार्थ्यांचा गट जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रमात सहभागी झाला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध राज्यांतील संस्कृती, परंपरा, भौगोलिक परिस्थिती आणि जीवनशैली समजून घेण्याची संधी मिळत आहे.
याशिवाय डिसेंबर महिन्यात आणखी २७ विद्यार्थ्यांचा गट युरोपमधील युरोपियन अवकाश संस्था आणि इतर आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक व शैक्षणिक संस्थांना भेट देणार आहे. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना युरोपमधील अवकाश संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आणि क्षमता आहे. त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास ते जागतिक स्तरावर निश्चितच आपली छाप पाडू शकतात. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक संधींची दरी कमी होण्यास मदत होईल.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे-पाटील म्हणाले, काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आपल्या राज्याच्या सीमेपलीकडे जाण्याची संधीही क्वचितच मिळत होती. आज हेच ग्रामीण भागातील विद्यार्थी अमेरिकेला जाऊन नासासारख्या जगप्रसिद्ध संस्थांना भेट देत आहेत, ही जिल्हा परिषदेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता देश-विदेशातील नामांकित शैक्षणिक संस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि विविध संस्कृतींचा प्रत्यक्ष अनुभव देणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहे.
*मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील म्हणाले,* गेल्या वर्षी २५ विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील नासाला भेट देऊन जागतिक दर्जाच्या विज्ञान आणि संशोधनाचा अद्भुत अनुभव घेतला. या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासातून यंदा हा उपक्रम दुसऱ्या वर्षी अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. २० हजार विद्यार्थ्यांमधून आयुकाच्या तीन टप्प्यांतील निवड प्रक्रियेद्वारे २५ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड होणे ही मोठी उपलब्धी आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
पुणे जिल्हा परिषदेचा हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण, विज्ञान आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक व्यासपीठाची जाणीव निर्माण करणे, आत्मविश्वास, वैज्ञानिक दृष्टिकोन, नेतृत्वगुण आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात त या विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.