रायगडच्या सहकार क्षेत्रात कौशल्यविकासाचे नवे पर्व!
Xtreme Today
30-10-2026 18:55:40
9935562
रायगडच्या सहकार क्षेत्रात कौशल्यविकासाचे नवे पर्व!
नागाव (डॉ. जयपाल पाटील ब्युरो चीफ यांजकडून) - रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने आणि रायगड जिल्हा ईएम-पॅक्स सहकारी संस्थांचा महासंघ मर्यादित (रामफेड), अलिबाग यांच्या वतीने सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कौशल्यविकासाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत रामफेडच्या प्रशिक्षण कार्यालयाचे उद्घाटन आणि जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नागाव येथे झाले.
आयआयबीएफ आणि रामफेड यांच्यात झालेला सामंजस्य करार देशातील सहकार क्षेत्रातील पहिला करार असल्याचे नमूद करून, यामुळे सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बदलत्या बँकिंग पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि आर्थिक व्यवहारांचे ज्ञान कर्मचाऱ्यांना असणे आवश्यक असून, पुढील दोन वर्षांत रामफेडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयआयबीएफचे कुलदीप जिंदाल यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना १९२८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेची २०२८ मध्ये शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण होणार असल्याचे सांगितले. बँकिंग क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ज्ञान आणि कौशल्य विकसित करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. बदलत्या बँकिंग क्षेत्रात नवीन नियम, कर्जविषयक कामकाज, आर्थिक व्यवहार, जोखीम व्यवस्थापन, ग्राहकसेवा आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामफेडसोबतच्या सामंजस्य करारामुळे ग्रामीण व जिल्हास्तरावरील सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये कर्ज प्रकरणे हाताळणे, कर्जवसुली, आर्थिक व्यवहार, लेखा व्यवस्थापन, ग्राहकसेवा, बँकिंगमधील नवीन बदल आणि संस्थांचे दैनंदिन कामकाज यांसारख्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
रामफेडच्या प्रशिक्षण कार्यालयामुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकार्य, रामफेडचा पुढाकार आणि आयआयबीएफचे मार्गदर्शन यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) च्या पश्चिम विभागीय व्यावसायिक विकास केंद्राचे प्रमुख कुलदीप जिंदाल, प्राध्यापक अरुण मिश्रा, अतिथी प्राध्यापक आर. कांचनमाला, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, रामफेडचे अध्यक्ष निनाद पाटील, उपाध्यक्ष तुकाराम पाटील, विशेष कर्तव्य अधिकारी श्रीकांत पाटील यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील यांनी हा दिवस रायगडच्या सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.