आरसीएफ थळ व तालुका कृषी अधिकारी, अलिबाग संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी मधमाशीपालन प्रशिक्षण कार्यक्रम
Xtreme Todayआरसीएफ थळ व तालुका कृषी अधिकारी, अलिबाग संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी मधमाशीपालन प्रशिक्षण कार्यक्रम मधमाशीपालन १०० पेट्यांचे वितरण करण्यापूर्वी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
28-10-2026 18:50:23
16357272
आरसीएफ थळ व तालुका कृषी अधिकारी, अलिबाग संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी मधमाशीपालन प्रशिक्षण कार्यक्रम

अलिबाग (प्रतिनिधी) - राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ), थळ युनिट आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत तालुका कृषी अधिकारी, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी मधमाशीपालन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आरसीएफ थळ येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्रात करण्यात आले. आरसीएफच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मधमाशीपालना साठी प्रोत्साहन देणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देणे आणि शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
आरसीएफ थळतर्फे शेतकऱ्यांना १०० मधमाशीपालन पेट्यांचे वितरण करण्यात येणार आहे. या पेट्यांचा प्रभावी वापर करता यावा, मधमाशांच्या वसाहतींचे योग्य व्यवस्थापन करता यावे आणि मधमाशीपालन व्यवसाय शास्त्रोक्त पद्धतीने यशस्वीरीत्या राबविता यावा, यासाठी पेट्यांच्या वितरणापूर्वी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केवळ साधनसामग्री उपलब्ध करून न देता शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक ज्ञान व व्यावहारिक कौशल्य मिळावे, यावर या उपक्रमात विशेष भर देण्यात आला.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र (KVK), बारामती येथील विषयतज्ज्ञ श्री. प्रशांत गावडे आणि श्री. संतोष करंजे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मधमाशीपालनाचे महत्त्व, मधमाशांच्या वसाहतींची रचना, मधमाशांचे संगोपन, पेट्यांची योग्य जागी स्थापना, वसाहतींचे व्यवस्थापन, पेट्यांची निगा व देखभाल तसेच मध उत्पादनाच्या विविध बाबींची माहिती दिली. याशिवाय, पिकांच्या परागीभवनामध्ये मधमाशांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, मधमाशांमुळे पिकांच्या उत्पादकतेत सुधारणा होण्यास मदत होते, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मधमाशीपालन पेटीच्या साहाय्याने घेण्यात आलेले प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे तज्ज्ञांनी मधमाशीपालन पेटीची रचना, पेटी हाताळण्याची योग्य पद्धत, मधमाशांच्या वसाहतीचे निरीक्षण, वसाहतीचे आरोग्य टिकविण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि पेट्यांच्या नियमित देखभालीचे महत्त्व समजावून सांगितले. मधमाशांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, त्यांच्या वसाहतींचे योग्य व्यवस्थापन करणे आणि मध उत्पादनासाठी आवश्यक बाबींचे पालन करणे याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळाली. या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना मधमाशीपालन व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या तांत्रिक बाबी समजून घेण्यास मदत झाली.
या कार्यक्रमात अलिबागचे तालुका कृषी अधिकारी श्री. तन्मय भगत आणि श्री. बाळासाहेब मोरे यांनी सहभाग घेतला. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे, शेतीपूरक व्यवसायांच्या संधींचा लाभ घेण्याचे आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे आवाहन केले.*आकाशातील वीजापासुन शेतकऱ्यांनी कायम सुरक्षित रहावे- डॉ. जयपाल पाटील*
त्यावेळी आपल्या मनोगतात प्रगतिशील शेतकरी तथा आपत्ती व्यवस्थापन तज्ञ म्हणून डॉ. जयपाल पाटील यांनी आपत्ती सुरक्षेचे धडे देताना घरातून शेतावर अथवा नारळ, सुपारी, आंबा येथे जाता येताना अचानक आकाशात विजा चमकू लागल्या तर आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या दामिनी ॲप मध्ये वीज कोठे पडणार व किती अंतराने पडणार हे पहावे आणी सुरक्षित रहावे असा संदेश दिला, वर्षे सर्व शेतकऱ्यांतर्फे आयोजकांचे आभार मानले
या कार्यक्रमाला आरसीएफ थळचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. राकेश कवळे, श्री. योगेंद्र भोईर आणि जनसंपर्क अधिकारी श्री. सुरेश चौधरी उपस्थित होते.
आरसीएफच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम शेतकऱ्यांचे कौशल्यविकास, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि ग्रामीण भागातील शाश्वत उपजीविकेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मधमाशीपालन पेट्यांचे वितरण आणि त्यापूर्वी दिले जाणारे तांत्रिक प्रशिक्षण यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, पूरक उत्पन्नाचे साधन निर्माण करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे, या दिशेने आरसीएफ थळने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
आरसीएफ थळ आपल्या सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून शेतकरी कल्याण, कृषी विकास आणि स्थानिक समुदायांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.