Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पिंपरी - चिंचवड

अभिजात मराठी भाषा सप्ताह अंतर्गत बालगीतांच्या मैफलीस भरभरुन प्रतिसाद; पिंपरी चिंचवड मनपातर्फे आयोजन

Xtreme Today   06-10-2026 18:35:34   553913

अभिजात मराठी भाषा सप्ताह अंतर्गत बालगीतांच्या मैफलीस भरभरुन प्रतिसाद; पिंपरी चिंचवड मनपातर्फे आयोजन

 

पिंपळे सौदागर (सांस्कृतिक प्रतिनिधी) - गणपती उत्सवातील आठवणी, भूक लागलेल्या कावळेदादासाठी चिमणीने आणलेला पाव, दुध पिणारी मनीमाऊ, प्राण्यांना घेऊन जाणारी झुकझुक गाडी, डूलत चाललेला हत्तुल्या, कोंबडीच्या पिल्लाची शिकवणी अशा बहारदार वर्णनाच्या बालगीत मैफलीस बच्चेकंपनीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

निमित्त होते मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने " अभिजात मराठी भाषा सप्ताह अंतर्गत मंगळवार दि. ६ रोजी सुप्रसिद्ध गीतकार, गायिका आणि संगीतकार भारती न्यायाधीश यांच्या बालगीतांच्या कार्यक्रमाचे. संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,  अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम झाला.

 

विजय न्यायाधीश यांच्या संकल्पनेतून सादर झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात "  या हो या,  या हो या गणपती बाप्पा लवकर या " या गीताने करण्यात आली. त्यानंतर भारती न्यायाधीश आणि त्यांचे बालकलावंत ध्वनी गुप्ता, ईरा चायनाखवा आणि शौर्यवी मांडवगडे यांनी एकापेक्षा एक सरस बालगीते सादर करुन उपस्थित रसिक विद्यार्थ्यांची मने जिंकली. " आमच्या घरची मनीमाऊ ", " कावळेदादा काव काव ", " झुक झुक झुक निघाली जंगलक्वीन ", " हत्तुल्या रे हत्तुल्या ", " कोंबडीने शिकविले पिल्लाला " या काही बालगीतांना शालेय विद्यार्थ्यांनी विशेष दाद दिली. " डुबी डुबी डम डम " या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे ग्रंथालय समन्वयक प्रविण चाबुकस्वार , प्रशासकीय अधिकारी दत्तात्रय सुर्यवंशी तसेच किशोर केदारी आणि साळवे यांचे सहकार्य लाभले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती