Xtreme Today 08-09-2026 20:15:52 358264904
पुणेकरांकडून एमएच १२ नंतर आता एमएच ६१ ला भरभरून प्रतिसाद; चारचाकी वाहनांसाठी ‘एमएच ६१ ए’; तर दुचाकींसाठी ‘एमएच ६१ बी’ मालिका सुरू पुणे (विशेष प्रतिनिधी) - प्रादेशिक परिवहन कार्यालयाला नव्याने मिळालेल्या ‘एमएच ६१’ वाहन नोंदणी क्रमांक मालिकेला वाहनधारकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. दुचाकींसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एमएच ६१ बी’ मालिकेतील बहुतांश क्रमांक अवघ्या सात दिवसांत नोंदवले गेले असून, पुढील एका दिवसात ही मालिका संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आरटीओ’ प्रशासनाने आता दुचाकींच्या पसंती क्रमांकासाठी ‘एमएच ६१ सी’ ही मालिका सुरू केली आहे. पुण्याची ओळख असलेल्या ‘एमएच १२’ मालिकेतील उपलब्ध क्रमांक संपल्यानंतर पुणेआरटीओला ‘एमएच ६१’ हा नवीन नोंदणी क्रमांक देण्यात आला. पुण्याची ओळख कायम ठेवण्यासाठी ‘एमएच १२’ हीच मालिका पुढे सुरू ठेवावी, अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. दुचाकींच्या ‘एमएच ६१ बी’ मालिकेतील बहुतांश क्रमांक केवळ सात दिवसांत संपले आहेत. आता ‘एमएच ६१ सी’ मालिका सुरुवातीला पसंती क्रमांकांसाठी खुली आहे. वाहनधारकांना आठ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत अर्ज करता येईल. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी एका क्रमांकासाठी जास्त अर्ज आलेल्यांचा लिलाव होईल. त्यानंतर नऊ सप्टेंबरपासून ही मालिका दुचाकी वाहनधारकांसाठी खुली होणार आहे. दुचाकीच्या ‘एमएच ६१बी’ नवीन मालिकेत आकर्षक आणि व्हीआयपी क्रमांकांसाठीही मोठी चुरस पाहायला मिळाली. पसंतीच्या क्रमांकांसाठी आरटीओकडे तब्बल एक हजार ८२ अर्ज दाखल झाले होते. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्याने लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये ‘९’ या सिंगल डिजिट क्रमांकासाठी सर्वाधिक तीन लाख ७१ हजार रुपयांची विक्रमी बोली लागली. त्याचबरोबर ६, ५, ५५५, १२३४ आणि ९९०९ या आकर्षक क्रमांकांसाठीही वाहनधारकांनी मोठी रक्कम मोजली.