आर्थिक राजधानी मुंबईकरांचा रोजचा प्रवास अधिक वेगवान आणि सोपा करण्यासाठी मुंबईतील मेट्रो सेवेचा वेगाने होणार विस्तार
Xtreme Today
05-08-2026 19:43:45
9928603
आर्थिक राजधानी मुंबईकरांचा रोजचा प्रवास अधिक वेगवान आणि सोपा करण्यासाठी मुंबईतील मेट्रो सेवेचा वेगाने होणार विस्तार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आर्थिक राजधानी मुंबईकरांचा रोजचा प्रवास अधिक वेगवान आणि सोपा करण्यासाठी मुंबईतील मेट्रो सेवेचा वेगाने विस्तार होत आहे. चालू आर्थिक वर्षात आणखी चार नव्या मार्गिका सुरू होणार असून, त्यामुळे एकूण १५० किलोमीटरचे मेट्रो जाळे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. 'मुंबई ३.०' च्या माध्यमातून महामुंबईच्या आर्थिक विकासाचे नियोजन आणि भविष्यातील मुंबईचे चित्र कसे असेल, याविषयी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
नव्या मेट्रो मार्गिका लवकरच प्रवाशांच्या सेवेत :
सध्या मुंबईत १०१ किलोमीटरची मेट्रो धावत असून, या वर्षाअखेर हा टप्पा १५० किलोमीटरपर्यंत पोहोचेल. यामध्ये प्रामुख्याने
खालील मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे:
* मेट्रो मार्ग २-ब अंतर्गत डायमंड गार्डन चेंबूर तसेच डी. एन. नगर-सारस्वत नगर हे टप्पे सुरू होतील. चेंबूर स्थानक सुरू झाल्यावर मेट्रो, मोनोरेल आणि उपनगरी रेल्वे यांची महत्त्वपूर्ण जोडणी होईल.
* मेट्रो ४ अंतर्गत कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन आणि मेट्रो ४-अ चा कासारवडवली ते गायमुख हा संपूर्ण मार्ग सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.
* मेट्रो ५ अंतर्गत ठाणे-भिवंडी (टप्पा-१) आणि मेट्रो ९ अंतर्गत काशिगाव-मीरा भाईंदर (टप्पा-२) हे मार्गही कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
कोस्टल रोड, बीकेसी आणि विमानतळाला जोडणारा भुयारी बोगदा :
मुंबई किनारी मार्गाला (कोस्टल रोड) बीकेसी, बुलेट टर्मिनस आणि विमानतळाशी जोडणाऱ्या प्रस्तावित भुयारी बोगद्याच्या मार्गाचे (अलाईनमेंट) काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी आयआयटी मुंबई आणि नार्वेजियन जिओटेक्निकल इन्स्टिट्यूट (NGI) यांचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले जात आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुमारे २० किलोमीटरचा असून याचा व्यवहार्यता अभ्यास सुरू आहे. यामुळे किनारी मार्ग, बीकेसी आणि विमानतळादरम्यान अतिशय वेगवान संपर्क प्रस्थापित होईल.
मरीन ड्राईव्हचे रुंदीकरण आणि आकर्षक वॉटरफ्रंट :
मरीन ड्राईव्हचा प्रस्तावित उपक्रम हा स्वतंत्र रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प नसून तो ऑरेंज गेट रोड बोगदा प्रकल्पाशी संबंधित आहे. भविष्यातील वाहतुकीचा भार लक्षात घेऊन सागरी बाजूस अंदाजे ३,००० चौरस मीटर क्षेत्रफळाचे प्रॉमेनाड विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे विद्यमान प्रॉमेनाडचे रुंदीकरण होईल आणि नागरिकांना अधिक सुसज्ज व सुरक्षित वॉटरफ्रंट मिळेल. यासाठी आवश्यक पर्यावरणीय परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
वडाळा येथे साकारणार फिनटेक सिटी :
वडाळा प्रकल्प हा केवळ जमीन विकासाचा नसून शाश्वत महसूल निर्माण करणारा उपक्रम आहे. नीती आयोगाच्या शिफारशीनुसार वडाळा येथे 'फिनटेक सिटी' विकसित करण्याचा विचार आहे. वित्तीय तंत्रज्ञान, रोजगार आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही मोठी संधी ठरू शकते. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (BKC) धर्तीवर, वडाळा हे भविष्यातील आर्थिक विस्ताराचे नवे जागतिक दर्जाचे व्यावसायिक केंद्र म्हणून उदयास येईल.
प्रकल्पांसाठी निधीची उभारणी :
सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांसाठी एमएमआरडीएने विविध संस्थांसोबत करार करून सुमारे ४.०७ लाख कोटींच्या क्रेडिट लाइन्स उपलब्ध केल्या आहेत. जमीन विक्री, एफएसआय प्रीमियम, बहुपक्षीय वित्तीय संस्था, बाँड्स तसेच राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून या विकासकामांसाठी निधी उभा केला जात आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.