वैजापूरच्या "रिंग वॉटर ग्रीड" संकल्पनेकडे राज्याचे लक्ष वेधण्याची मागणी; भविष्यातील शहरांसाठी ठरू शकते आदर्श मॉडेल
Xtreme Today
01-08-2026 12:36:33
2739975
वैजापूरच्या "रिंग वॉटर ग्रीड" संकल्पनेकडे राज्याचे लक्ष वेधण्याची मागणी; भविष्यातील शहरांसाठी ठरू शकते आदर्श मॉडेल
वैजापूर (प्रतिनिधी) - वैजापूर शहराच्या नियोजित पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी "रिंग वॉटर ग्रीड" संकल्पनेवर आधारित दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा प्रस्ताव सामाजिक कार्यकर्ते व जलव्यवस्थापन अभ्यासक रामचंद्र कमल कृष्णराव पिल्दे यांनी प्रशासनाकडे सादर केला असून, या संकल्पनेची दखल केवळ वैजापूरपुरती न घेता राज्यातील भविष्यात विकसित होणाऱ्या शहरांसाठीही शासनाने धोरणात्मक पातळीवर विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी श्री. अरुण जराड, वैजापूर नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. बिघोत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आले.
प्रस्तावात वैजापूर शहराचा पुढील ३० ते ५० वर्षांतील विस्तार, वाढती लोकसंख्या, प्रस्तावित एमआयडीसी, नव्या निवासी वसाहती आणि भविष्यात नगरपालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या ग्रामीण भागाचा विचार करून आजपासूनच दीर्घकालीन जलनियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, बेलगाव शिवारातील जुन्या दगडी खदानीचा मोठ्या जलसाठ्यात विकास करणे, नांदूर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्यातून बंदिस्त भूमिगत पाइपलाइनद्वारे पाणी उपलब्ध करण्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करणे आणि शहराभोवती "रिंग वॉटर ग्रीड नेटवर्क" उभारणे, हा भविष्यातील जलसुरक्षेचा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.
यासंदर्भात पुण्यातील काही ज्येष्ठ पत्रकारांनीही या संकल्पनेचे स्वागत करत, "हा केवळ एका शहराचा प्रस्ताव नसून, राज्याच्या जलनियोजनाला नवी दिशा देऊ शकणारा विचार आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन भविष्यात निर्माण होणाऱ्या शहरांच्या विकास आराखड्यात अशा रिंग वॉटर ग्रीड प्रणालीचा विचार केल्यास पाणीपुरवठा, जमीन संपादन, भविष्यातील वाढती मागणी आणि जलव्यवस्थापनातील अनेक अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात," असे मत व्यक्त केले.
तसेच आज जी गावे ग्रामीण आहेत, ती उद्या शहर किंवा नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट होण्याची शक्यता लक्षात घेऊन, त्यांच्या आजूबाजूच्या तलाव, बंधारे, पाझर तलाव आणि इतर जलस्रोतांना आतापासूनच नियोजनबद्ध पद्धतीने रिंग वॉटर ग्रीड प्रणालीशी जोडण्याचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सुचविले. अशा प्रकारचे नियोजन केल्यास भविष्यात नवीन शहरांना पुन्हा महागड्या पाणीपुरवठा योजना उभारण्याची गरज कमी होईल आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक कार्यक्षम वापर करता येईल.
रामचंद्र पिल्दे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरसह विविध शहरांतील पाणीपुरवठा योजनांच्या अनुभवातून धडा घेत, वैजापूरसारख्या विकसित होत असलेल्या शहरांमध्ये दूरदृष्टीने नियोजन करणे ही काळाची गरज आहे. आज केलेले शास्त्रीय नियोजनच उद्याचा मोठा आर्थिक खर्च, तांत्रिक अडचणी आणि पाणीटंचाई टाळू शकते.
या प्रस्तावावर संबंधित विभागांनी संयुक्त तांत्रिक सर्वेक्षण, व्यवहार्यता अहवाल, सर्व संबंधित विभागांची समन्वय बैठक आणि दीर्घकालीन "वॉटर मास्टर प्लॅन" तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
जलसुरक्षा, शाश्वत विकास आणि भविष्यातील शहर नियोजन यांचा विचार करता, वैजापूरची "रिंग वॉटर ग्रीड" संकल्पना राज्यातील इतर विकसित होत असलेल्या शहरांसाठीही मार्गदर्शक ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.