पीएमआरडीए'ची संकटमोचक टीम; शेकडो नागरिकांचे जीव वाचविण्यात यश...!!
xtreme2day
07-07-2026 22:03:36
405731895
पीएमआरडीए'ची संकटमोचक टीम; शेकडो नागरिकांचे जीव वाचविण्यात यश...!!
भक्ती विठ्ठलाची... सेवा आरोग्याची! लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यरक्षणासाठी सज्ज आरोग्य यंत्रणा

पुणे (प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर, पाणी साचणे, भूस्खलन आणि आग यांसारख्या आपत्कालीन घटना घडत असताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत अग्निशमन दल आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (पीडीआरएफ) संकटमोचक ठरत आहे. गेल्या २४ तासांत लोणावळा, मावळ, खेड, लोहगाव, लोणी काळभोर आदी भागांत बचाव पथकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले असून, अनेक ठिकाणी शोध व बचाव मोहिमा अद्याप सुरू आहेत.

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'पीएमआरडीए'ची संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पूरग्रस्त भागांत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, भूस्खलनाच्या घटनांमध्ये शोधकार्य करणे तसेच विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये तातडीने मदत पोहोचविणे, अशा विविध कारवाया युद्धपातळीवर सुरू आहेत.
लोणावळ्यातील ग्रीन लँड व्हिला येथे पाण्यात अडकलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. कार्ले येथील माऊंट वेस्ट क्रिस्टा सोसायटीमध्ये पाण्याने वेढलेल्या २१ नागरिकांची लाइफ जॅकेट, लाइफ रिंग आणि दोरांच्या साहाय्याने सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच इंडियन ऑईल पेट्रोल पंप परिसरात अडकलेल्या तीन नागरिकांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
लोहगाव येथील आदर्श नगर परिसरात पाण्यात अडकलेल्या प्रवासी बसमधील १० ते १२ प्रवाशांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. मळवली येथील सूर्य व्हिला परिसरात पाण्याने वेढलेल्या २० नागरिकांसह एका पाळीव कुत्र्यालाही सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. तसेच मळवली-बोरज रोडवरील अंकित ग्रुप सोसायटीमध्ये अडकलेल्या १५ नागरिकांची, तर वाकसाई येथील वालोसिटी व्हिला, मँगो व्हिला आणि ओरिकल व्हिला परिसरातील तब्बल ३४ नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
खेड तालुक्यातील रेटवडी येथे पाण्यात बुडालेल्या व्यक्तीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले असून, शेलू येथे बुडालेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. तसेच लोणावळ्यातील नॉर्थ पॉईंट आणि श्री सिक्स्टी रिसॉर्ट परिसरात झालेल्या भूस्खलनानंतर काही व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने तेथेही शोध व बचाव मोहीम सुरू आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने 'पीएमआरडीए'ने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असून, आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात अथवा नदीकाठी जाणे टाळावे, सखल भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संकटाच्या या काळात 'पीएमआरडीए'चे अग्निशमन दल आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक सातत्याने कार्यरत असून, नागरिकांच्या जीविताचे संरक्षण हेच सर्वोच्च प्राधान्य मानत बचावकार्य अविरत सुरू ठेवले आहे.
महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, "अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 'पीएमआरडीए'चे अग्निशमन दल आणि 'पीडीआरएफ'चे अधिकारी व जवान अत्यंत तत्परतेने आणि समन्वयाने कार्य करत आहेत. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, प्रत्येक आपत्कालीन घटनेला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यकतेनुसार बचाव पथकांना सहकार्य करावे."

निवारा केंद्रे, हिरकणी कक्ष आणि शुद्ध पाणी व्यवस्थेसह सर्वसमावेशक आरोग्य नियोजन; आज श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीत सेवा सुरु
आषाढी वारी म्हणजे केवळ श्रद्धेचा महासागर नाही, तर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारीही तितकीच मोठी असते. ऊन, पाऊस, लांबचा पायी प्रवास, बदलते हवामान आणि मोठी गर्दी या सर्व आव्हानांमध्ये प्रत्येक वारकरी सुरक्षित आणि निरोगी राहावा, यासाठी यंदाच्या पालखी सोहळा २०२६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने "भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची" हे ब्रीदवाक्य स्वीकारत अत्यंत व्यापक आणि नियोजनबद्ध व्यवस्था उभी केली आहे. आज श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीत सेवा सुरु करण्यात आली आहे.
७ जुलै ते २९ जुलै या संपूर्ण वारी कालावधीत पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहेत. तब्बल १९२ वैद्यकीय सेवा पथके, १३३ वैद्यकीय अधिकारी, ३७८ आरोग्य कर्मचारी, ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४४ आरोग्य उपकेंद्रे वारकऱ्यांच्या सेवेत कार्यरत राहतील. एवढेच नव्हे, तर दर दोन किलोमीटरवर रुग्णवाहिका पथके तैनात करण्यात आली असून पालखीसोबत सुरुवातीपासून परतीच्या प्रवासापर्यंत २४ तास कार्यरत सहा फिरती वैद्यकीय पथके सतत सेवेत असतील.
गंभीर परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत यासाठी १७६ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये १०८ आपत्कालीन सेवेंतील ALS आणि BLS रुग्णवाहिका तसेच १०२ सेवेंतील रुग्णवाहिका समाविष्ट आहेत. त्यामुळे कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.
वारीत सहभागी होणाऱ्या दिंडी प्रमुखांना ४,५०० औषध किट देण्यात येणार आहेत. ताप, वेदना, पोटाचे विकार, अॅलर्जी, निर्जलीकरण आणि किरकोळ जखमांवर प्राथमिक उपचार करता यावेत, यासाठी पॅरासिटामॉल, डायक्लोफेनाक, मेट्रोनिडाझोल, सेंट्रिझिन, ओआरएस, मलम आणि पट्ट्यांचा समावेश या किटमध्ये करण्यात आला आहे.
महिला आणि बालकांच्या गरजांचा विशेष विचार करत पालखी मार्गावर १५ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. येथे विश्रांती, औषधोपचार, तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध असेल. त्याचबरोबर स्तनदा माता आणि बालकांसाठी १२ हिरकणी कक्ष सुरू करण्यात आले असून, स्वतंत्र विश्रांती व्यवस्था, वैद्यकीय सेवा आणि बालकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आरोग्यदायी वारीसाठी शुद्ध पाणी हा महत्त्वाचा घटक मानत आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. २०० पाण्याचे टँकर्स आणि ९८ फिलिंग पॉईंट्स कार्यरत राहतील. प्रत्येक टँकरची पाणी गुणवत्ता तपासल्यानंतरच तो पुढे पाठवला जाणार असून, खाजगी टँकर्सच्या तपासणीसाठी दर पाच किलोमीटरवर स्वतंत्र तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. जलजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.
वारीदरम्यान अन्नातून होणारे आजार टाळण्यासाठी पालखी मार्गावरील हॉटेल्स, ढाबे आणि उपहारगृहांची नियमित तपासणी केली जाणार आहे. उघडे, शिळे अथवा नासलेले अन्न विक्रीस प्रतिबंध करण्यात आला असून, अन्न हाताळणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणीही बंधनकारक करण्यात आली आहे.
यंदाच्या नियोजनातील आणखी एक दूरदृष्टीचा निर्णय म्हणजे "आषाढी पालखी विकास आराखडा". ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पालखी मार्गावरील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कायमस्वरूपी अतिदक्षता विभाग स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. वारीपुरती मर्यादित न राहता ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला दीर्घकालीन बळ देणारे हे पाऊल ठरणार आहे.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या अध्यात्माची ओळख आहे. या अध्यात्माच्या प्रवासात लाखो वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा मानत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने उभारलेली ही सर्वसमावेशक यंत्रणा म्हणजे सेवा, संवेदनशीलता आणि सुयोग्य नियोजनाचा आदर्श आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणाबरोबरच प्रत्येक वारकरी सुरक्षित, निरोगी आणि आनंदाने पंढरीची वाट चालू शकेल, यासाठी आरोग्य विभागाची ही सज्जता वारीच्या व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी अध्याय ठरत आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.