Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

कल्याणीनगर स्थानक ते पुणे लोहगाव विमानतळापर्यंत नवा मेट्रो मार्ग; शेवळेवाडी- हडपसर- कात्रज मेट्रो मार्गाचाही चांदणी चौक-वाकडपर्यंत विस्तार

xtreme2day   02-07-2026 20:47:35   128073804

कल्याणीनगर स्थानक ते पुणे लोहगाव विमानतळापर्यंत नवा मेट्रो मार्ग; शेवळेवाडी- हडपसर- कात्रज मेट्रो मार्गाचाही चांदणी चौक-वाकडपर्यंत विस्तार

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुण्यात मेट्रो मार्गाचा विस्तार होणार आहे. हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी कल्याणीनगर स्थानक ते लोहगाव विमानतळापर्यंत नवा मेट्रो मार्ग बनणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका आणि महा मेट्रोसह या मार्गावर मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी लोहगाव विमानतळापर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे. महा मेट्रोने या मार्गाची व्यवहार्यता तपासून हा निर्णय घेतला आहे. 

 

 अलीकडेच मंगळवारी झालेल्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. सर्व पर्यायांची तपासणी करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. प्रस्तावित मार्गामुळे विमान प्रवाशांसाठी शहरांदरम्यान प्रवास करणं सोपं होणार आहे. सध्या पुण्यातील एकमेव विमानतळावर थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी नाही. प्रवाशांना येरवडा मेट्रो स्थानकावरून लोहगाव विमानतळापर्यंत प्रवास करावा लागतो. मेट्रो स्थानकावरून प्रवासाचा दुसरा पर्याय शोधावा लागतो. खाजगी कॅबने प्रवास करणं महाग पडतं आणि वाहतूककोंडीची समस्याही वाढते. यामुळे गेल्या वर्षी मोहोळ यांनी महा मेट्रोला पुणे विमानतळाला जोडणारी मेट्रो मार्गिका तयार करण्यासाठी पर्याय शोधण्याचे आदेश दिले होते. सध्या पुणे मेट्रोचा फेज २ अंतर्गत विस्तार सुरू आहे. या विस्ताराच्या योजनेतून विमानतळापर्यंत कनेक्टिव्हिटीचा पर्याय वगळण्यात आला होता. पण आता या नव्या मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

पुणे मेट्रो सध्या दोन मार्गांवर धावते. लाइन १ (पीसीएमसी ते स्वारगेट) लाइन २ (वनाझ ते रामवाडी) या मार्गांवर मेट्रोसेवा उपलब्ध आहे. कल्याणीनगर स्थानक लाइन २ वर आहे. सिविल कोर्ट स्थानकावर लाइन १ आणि २ साठी इंटरचेंज उपलब्ध आहे. तसेच, नवीन सुरू होणाऱ्या मेट्रो लाइन ३ (हिंजवडी ते शिवाजीनगर) लाही जोडणार आहे. त्यामुळे या तिन्ही मार्गांवरील प्रवाशांना लोहगाव विमानतळापर्यंत प्रवास करता येणार आहे. शिवाय प्रस्तावित मेट्रो लाइन ४ (खडकवासला ते खराडी)सुद्धा कल्याणीनगर स्थानकाशी जोडलेलं असेल. त्यामुळे शहरातील सर्व चार मेट्रो मार्गांवरील प्रवास विमानतळापर्यंत सहजपणे पोहोचू शकतात. 

 

पौड फाटा ते वनदेवी मंदिरापर्यंत डबल डेकर उड्डाणपूल बांधण्याचेही निर्देश दिले. या मार्गामुळे पाच सिंग्नल जंक्शनच्या बॉटलनेक परिसरात वाहतूक कोंडी फुटण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यांनी कचरा डेपोपासून चांदणी चौक मेट्रो स्थानकापर्यंत डबल डेकर उड्डाणपूल बांधण्याचेही निर्देश दिले. मेट्रो लाइन २ चा वानझ ते चांदणी चौकापर्यंत विस्तार होत आहे. या पुलावरील खालच्या भागत वाहनांची वाहतूक आणि वरील भागावरून मेट्रो मार्गिका तयार केली जाणार आहे. तसेच, शेवळेवाडी-हडपसर-कात्रज मेट्रो मार्गाचाही चांदणी चौक-वाकडपर्यंत विस्तार करण्याचे निर्देश दिले. या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो), पुणे महापालिका आणि कोथरूडमधील स्थानिक नागरिक यांच्या बैठकीत सविस्तर चर्चेनंतर उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याचे निश्चित करण्यात आले. पुढील तीन ते चार दिवसांत याबाबतचा सुधारित आराखडा सादर करण्याच्या सूचना मंत्री मोहोळ यांनी महामेट्रोला दिल्या. 

 

वनाझ ते चांदणी चौक मेट्रोच्या आराखड्याबाबत कोथरूड सिटीझन फोरमने अनेक आक्षेप नोंदविले होते. याच मार्गावर कोथरूड डेपोच्या चौकात होणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यासह इतरही काही सूचना त्यांनी केल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून महामेट्रोसह महापालिका प्रशासनासोबत सातत्याने त्यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर बुधवारी मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा झाल्यानंतर दोनशे ते अडीचशे मीटरने उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यावर शिक्कामोर्तब झाले. वाढीव खर्चाचा बोजा पालिकेतर्फे उचलण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. यापूर्वी महापालिकेने एकमजली उड्डाणपूल बांधण्याची योजना आखली होती. पण मेट्रोच्या विस्तारामुळे महामेट्रोने नल स्टॉपप्रमाणेच डबल डेकर उड्डाणपुलाचा प्रस्ताव मांडला आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात रामवाडी ते वनाझ मेट्रोचा चांदणी चौकपर्यंत विस्तार करण्यात येत आहे. या मार्गावर दोन स्थानक असतील आणि ही मार्गिका पूर्णपणे उन्नत असेल. या संपूर्ण विस्तारासाठी ३,६२६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक स्थानकांचा समावेश असेल.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती