Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पिंपरी - चिंचवड

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

xtreme2day   06-04-2026 20:47:12   64999

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान 

 

चिंचवड : महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने शहरामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्टर उभे केले जाणार असून त्यामध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आणि डिजीटल मिडिया परिषद यांच्यावतीने आयोजित विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान रणरागिणी सोहळ्यात ते बोलत होते.

 

 अ. भा. पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांच्या अध्यक्षतेखाली सायन्स पार्क येथे सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, परिषदेचे राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे, पुणे जिल्हा पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर,  पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर सुर्यवंशी, जिल्हा संघटक चिराग फुलसुंदर, जिल्हा समन्वयक मारुती बानेवार, महिला समन्वय रेखा भेगडे, महिला सरचिटणीस प्रज्ञा आबनावे यांची उपस्थिती होती. महिला दिनानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध क्षेत्रातील महिलांचा महापौर आणि उपमहापौर यांच्या हस्ते या कार्यक्रमात शाल , सन्मानचिन्ह आणि रोप देऊन सत्कार करण्यात आला. 

 

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या या सोहळ्यांमध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार - डॉ. किशोरी आपटे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार - सुप्रिया सचिन मंडलिक, त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार - सुभद्रा आत्माराम मोकाशे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार - स्वरांजली माने, पशुवैद्यकीय सेवारत्न पुरस्कार - डॉ. पूजा बोंबले, पिंपरी चिंचवड संस्कारत्न पुरस्कार - भारती न्यायाधीश, पिंपरी चिंचवड कलारत्न - ज्योती सेतसंदी, पिंपरी चिंचवड सिनेरत्न पुरस्कार - कृत्तिका तुळसकर, आणि रुग्णसेवा विशेष सन्मान स्वाती कुलकर्णी, शोभा तळेकर, शोभा ढोले यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण १४ महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष सागर सुर्यवंशी यांनी केले. गणेश मोकाशे, शरद पाबळे आणि सुनील लोणकर यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनय सोनवणे यांनी केले. अनिल वडगुले यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती