Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 अहिल्यादेवी नगर

प्रत्येक स्त्रीने स्वतःचे आरोग्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास याकडे विशेष लक्ष द्यावे आणि शिक्षण, संशोधन, नेतृत्व आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये पुढे यावे -प्रा. डॉ. गीता शिंदे

xtreme2day   12-03-2026 22:13:24   1793175

प्रत्येक स्त्रीने स्वतःचे आरोग्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास याकडे विशेष लक्ष द्यावे आणि शिक्षण, संशोधन, नेतृत्व आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये पुढे यावे -प्रा. डॉ. गीता शिंदे

संगमनेर (प्रतिनिधी) -  स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. ती सामाजिक, मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य जपत असताना एक संस्कारक्षम कुटुंब घडवते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःचे आरोग्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. महिलांनी शिक्षण, संशोधन, नेतृत्व आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये पुढे यावे असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाच्या प्रमुख  प्रा. डॉ. गीता शिंदे यांनी केले. 

 

संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेचे मातोश्री ललिता देवी मालपाणी शिक्षणशास्त्र महाविद्यालय व मातोश्री इंदिराबाई रतिलाल गांधी अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कल्याण मंडळ पुरस्कृत जागतिक महिला दिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाच्या प्रमुख  प्रा. डॉ. गीता शिंदे या प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर येथील प्रसिद्ध व्याख्यात्या व मुलाखतकार सौ. स्मिता गुणे मॅडम विराजमान होत्या. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.

कार्यक्रमास शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र भावे, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या सौ. सविता घुले, कमवा आणि शिका योजनेच्या विभाग प्रमुख डॉ. ज्योती मेस्त्री, तसेच बी.एड. व डी.एड. विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि छात्र-शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. प्रारंभी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यापीठ गीत सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष बी.एड.च्या विद्यार्थिनी कु. प्राची पाबळ यांनी केले. त्यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना समाजातील स्त्रीच्या योगदानाची जाणीव करून दिली. महिलांच्या शिक्षणामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडते आणि स्त्री सशक्तीकरणाद्वारे समाज अधिक प्रगत बनतो, असे त्यांनी सांगितले.

यानंतर विद्यार्थी कल्याण मंडळाच्या विभाग प्रमुख डॉ. ज्योती मेस्त्री यांनी कार्यक्रमाचे औपचारिक प्रास्ताविक केले. त्यांनी महिला दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल माहिती देत स्त्रीशक्ती ही समाजाच्या प्रगतीची मुख्य प्रेरणा आहे असे नमूद केले. महिलांना शिक्षण, संधी आणि समान हक्क मिळाल्यास समाजाच्या विकासाला गती मिळते, असे त्यांनी आपल्या प्रास्ताविक मधून सांगितले.

यानंतर प्रमुख अतिथींचा परिचय व सत्कार प्रा. कविता काटे यांनी केला. त्यांनी प्रमुख अतिथी प्रा. डॉ. गीता शिंदे यांच्या शैक्षणिक कार्याचा, संशोधनातील योगदानाचा आणि समाजसेवेतील सहभागाचा उल्लेख करत त्यांचा प्रभावी परिचय करून दिला. त्यानंतर मान्यवरांचा शाल, सन्मानचिन्ह आणि हरित पुष्पदाणी देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

त्यानंतर महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा प्रा. कविता गवंदे मॅडम यांच्या सादरीकरणातून अत्यंत सुंदर आणि प्रभावी पद्धतीने पार पडला. या प्रसंगी महिला शिक्षिकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना सौ. स्मिता गुणे यांनी इतिहासातील अनेक धैर्यवान आणि कर्तृत्ववान स्त्रियांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यांनी राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की या महान स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने समाजात आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन समाजासाठी सकारात्मक कार्य केले पाहिजे.

यानंतर प्राचार्य डॉ. भालचंद्र भावे सर यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतातून महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की स्त्री ही समाजाच्या प्रगतीची प्रमुख शक्ती आहे. ज्ञानधिस्टीत समाज व्यवस्था होण्यासाठी कर्तृत्वान स्त्रियांची आवश्यकता आहे. शिक्षणामुळे ती अधिक सक्षम बनते आणि समाजाच्या सर्वांगीण विकासात तिचे योगदान अमूल्य ठरते. 

कार्यक्रमादरम्यान बी.एड. व डी.एड. विभागातील छात्र-शिक्षकांनी “शक्तीरूपेन ” या संकल्पनेवर आधारित सुंदर संगीतमय नाटिका सादर केली. या नाटिकेत स्त्रीच्या विविध रूपांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमासाठी प्रा. मंगला आरोटे, डॉ. राजू शेख, डॉ. ज्योती मेस्त्री, प्रा. कविता काटे, प्रा. खेमनर, प्रा. पंजे, प्रा. कविता गवंदे, प्रा. चंद्रकला सपनार, प्रा. सीमा कासार, प्रा. विद्या भवर, ग्रंथपाल कोमल मंकाळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्षा आडेप, सचिन वाकचौरे, मंडलिक सर, सुनील कुदळ आणि सुंदर सातपुते यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या शेवटी अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या सौ. सविता घुले मॅडम यांनी सर्व मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

कार्यक्रमाची सांगता कु. अनुजा सराफ यांनी सादर केलेल्या मंत्रमुग्ध “पसायदान” या सादरीकरणाने झाली. या प्रसंगी संपूर्ण सभागृहात आध्यात्मिक आणि शांत वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयाकडून सर्व विद्यार्थ्यांसाठी आईस्क्रीमची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

एकूणच, जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि उत्साहवर्धक ठरला. या कार्यक्रमातून स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित झाले आणि विद्यार्थ्यांना समाजातील स्त्रियांच्या योगदानाची जाणीव झाली. या कार्यक्रमाने उपस्थित सर्वांना स्त्रीसन्मान, स्त्रीसक्षमीकरण आणि सामाजिक समतेचा प्रभावी संदेश दिला.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती