शिक्षकविहीन शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची कहाणी आणि डॉ. संदीप वारगे यांचा लढा
xtreme2day
11-03-2026 22:48:15
1732587
शिक्षकविहीन शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची कहाणी आणि डॉ. संदीप वारगे यांचा लढा

रायगड (डॉ.जयपाल पाटील, ब्युरोचीफ यांजकडून)-रायगड जिल्ह्यातील नागाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था गेल्या साडेपाच महिन्यांपासून अत्यंत दयनीय होती. शाळेत विद्यार्थी होते; पण त्यांना शिकवायला शिक्षक नव्हते. या शिक्षकविहीन अवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. शाळेचे अस्तित्वच धोक्यात आले होते. शिक्षक नसल्याने शाळेच्या इमारतीत फक्त चार भिंती उरल्या होत्या, विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे मात्र कोमेजले होते.
अशा संकटकाळात नागाव केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून डॉ. संदीप दत्तात्रेय वारगे यांनी पदभार स्वीकारला. शिक्षणाबद्दलची त्यांची बांधिलकी आणि ओढ यामुळे त्यांनी हे आव्हान स्वीकारले. डॉ. वारगे यांनी शाळा वाचविण्यासाठी मोहीम सुरू केली. ग्रामस्थ, ग्रामपंचायत नागाव आणि पंचायत समिती कार्यालय यांच्याशी त्यांनी सातत्याने संपर्क साधला. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले. पंचायत समिती प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. बंद पडण्याच्या मार्गावर असलेली ही शाळा पुन्हा सुरू करण्यात डॉ. वारगे यांना यश आले.
या कार्यात गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी समायोजन प्रक्रियेनंतर शाळेला पूर्णवेळ शिक्षक देण्याची जबाबदारी स्वीकारली. यामुळे आता शाळेचे भवितव्य अधिक सुरक्षित झाले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले
नागाव परिसरातील अनेक विद्यार्थी हे गरीब, कामगार व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील आहेत. काही विद्यार्थी परगावहून आलेले असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी ही शाळा हाच शिक्षणाचा एकमेव आधार होता. जर ही शाळा बंद पडली असती तर या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते. मात्र डॉ. संदीप वारगे यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे हे नुकसान टळले आहे.
आदर्श शिक्षकाचा वसा
शिक्षणाविषयी विशेष प्रेम, नाविन्यपूर्ण उपक्रम, कृतीशील अध्यापन आणि विज्ञानपूरक उपक्रम राबविण्यासाठी डॉ. संदीप वारगे हे जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांनी या शाळेसाठी केलेले प्रयत्न सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहेत. एक शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षणाचा दीप तेवत ठेवण्याचे व्रत स्वीकारले आहे.
शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख विनोद पाटील, शिक्षकप्रेमी अमोल मोडक तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत डॉ. संदीप वारगे आणि सुनिता राठोड मॅडम यांनी केले.
पुढील काळात शाळेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन हर्षदा मयेकर (सरपंच, नागाव), आदेश मोरे (सदस्य, ग्रामपंचायत नागाव) तसेच पंचायत समिती प्रशासनाने दिले.
ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण
बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आलेली शाळा पुन्हा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रप्रमुख व राज्य आदर्श शिक्षक डॉ. संदीप वारगे यांच्या प्रयत्नांमुळे नागावची ही शाळा आता बंद न पडता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दीप कायम प्रज्वलित ठेवणार आहे.
मराठी शाळांचे वास्तव आणि प्रेम
मराठी भाषा आणि मराठी शाळा यावर सोशल मीडियावर सतत व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि त्यांना विद्यार्थी, ग्रामस्थ व सर्वच वर्गातून उदंड प्रतिसाद मिळतो. असे असतानाही ज्या शाळेमध्ये काही काळापूर्वी १०० ते १५० विद्यार्थी होते, तीच शाळा आज दहाच्या आत मर्यादित राहिली आहे. याला अनेक कारणे असतील; तरीही मराठी शाळांवरचे प्रेम अजूनही कायम आहे, हे निश्चित.
या शाळेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका शाळेमध्ये मराठी शाळा वाचविण्याकरिता चित्रपट निर्मिती झाली. तो चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेरही प्रचंड गाजला. बॉक्स ऑफिसवरचे विक्रम त्याने मोडीत काढले. असे असतानाही त्याच परिसरातील नागावची शाळा साडेपाच महिने शिक्षकविना होती, हे वास्तव अधिक दु:खद होते. हे चित्र डॉ.संदीप वारगे सर यांच्यामुळे बदलले, याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आता या शाळेने नव्या जोमाने वाटचाल सुरू केली आहे. डॉ. वारगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामपंचायत आणि पालकांच्या सहकार्याने शाळेचा विकास करण्याचा मानस आहे.
डॉ. संदीप वारगे यांची ही कहाणी केवळ एका शाळेपुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसाठी प्रेरणादायी आहे. एका शिक्षकाने केलेल्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे उज्वल होऊ शकते, याचा हा उत्तम आदर्श आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.