Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

स्वामी विवेकानंद यांच्या १६३ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक कर्वेनगर तर्फे भव्य रक्तदान शिबिर; १०५ जणांनी केले रक्तदान

xtreme2day   13-01-2026 20:07:25   952590

स्वामी विवेकानंद यांच्या १६३ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक कर्वेनगर तर्फे भव्य रक्तदान शिबिर; १०५ जणांनी केले रक्तदान

पुणे (प्रतिनिधी) - स्वामी विवेकानंद यांच्या १६३ व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी कर्वेनगर मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व शाखांच्या वतीने 'भव्य रक्तदान शिबिर' कर्वेनगर येथील ताथवडे उद्यानासमोरील मधुसंचय सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. 

 

कर्वेनगरमधील मधुसंचय सोसायटीचे विश्वस्त महेश पानसे,संगीता वाघ यांचे हस्ते स्वामी विवेकानंद आणि भारतमाता प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर सहकार्यवाह मंगेश घाटपांडे,कर्वेनगर संघचालक उदयन पाठक,रक्तदान शिबिर प्रकल्प प्रमुख महेश कुलकर्णी यांची मुख्य उपस्थिती होती.सुरवातीस जनकल्याण रक्तपेढी व उपस्थितांच्या वतीने "रक्तदान प्रार्थना" सामुहिकरीत्या म्हणण्यात आली. 

"स्वामी विवेकानंद हे एक महान विचारवंत,वक्ते आणि आध्यात्मिक गुरु होते त्यांनी भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक उत्थानासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.त्यांचे विचार आजही युवकांना प्रेरणा देतात"असे प्रतिपादन महेश पानसे यांनी रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.

ह्या रक्तदान शिबिरामध्ये १२९ जणांनी नोंदणी केली,त्यातील १०५ जणांनी रक्तदान केले,त्यामध्ये ९४ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश होता.चोवीस जणांना वैद्यकीय कारणांमुळे रक्तदान करता आले नाही,तरी त्यांची रक्तदान करण्याची इच्छा कौतुकास्पद होती.रक्तदात्यांमध्ये ४० टक्के स्वयंसेवक आणि ६० टक्के नागरिक उपस्थित होते.

कर्वेनगर नगरातील सर्व प्रभात शाखांनी यापूर्वी झालेल्या रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना संपर्क केला,सोसायट्यांमध्ये संपर्क करण्यात आला.तसेच आय.टी. मिलन,व्यवसायी शाखांनी गृहरचनांमध्ये जाऊन प्रत्यक्ष संपर्क,पत्रके वाटप,पोस्टर्स,समाजमाध्यमे यावर  रक्तदानाची जनजागृती करून नवीन रक्तदाते जोडले.

रक्तदान शिबिराच्या आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे.कर्वेनगर मधील स्वयंसेवकांनी पुढील वर्षी अजून उत्साहाने कार्य करून जास्त संख्येचे शिबिर घेण्याचा संकल्प केला आहे.

शिबिर यशस्वितेसाठी जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी संतोष अंगोळकर,डॉ पल्लवी कदम,अमृता मेटे,गणेश शिंदे,अमित चव्हाण,सुनीता थोरवे,सुनंदा पवार,किर्ती कुंभार, ओंकार पाडेकर,निकिता जाधव,ईशा कुंजीर यांचे सहकार्य लाभले.

 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती