xtreme2day 06-01-2026 18:38:50 6591483
भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर; एकमेकांपासून दुरावलेले पवार काका-पुतणे पुणे महापालिका निवडणुकीत एकत्रित आव्हान देणार! 165 जागा, 1165 उमेदवार!! पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुणे महापालिकेच्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष आहे. या निवडणुकीत सत्तारुढ महायुतीमधील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युतीची बोलणी शेवटच्या क्षणापर्यंत सुरु होती. पण, ही युती होऊ शकली नाही. भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाचं एकत्रित आव्हान आहे. गेल्या काही वर्षात एकमेकांपासून दुरावलेले पवार काका-पुतणे पुणे महापालिका निवडणुकीत एकत्र लढत आहेत. त्यामुळे पुण्याची निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. दरम्यान, एकेकाळी पुणे महापालिकेवर सत्ता गाजवलेला काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात आहे. उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा) आणि राज ठाकरे (मनसे) यांच्या पक्षानं मुंबई आणि अन्य महापालिकेप्रमाणे पुण्यातही युती केलीय. त्यामुळे पुण्याची लढत चौरंगी झाली आहे. पुणे महापालिकेच्या 41 प्रभागात एकूण 167 वॉर्ड आहेत. त्यापैकी दोन वॉर्डात भाजपाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिकबागमधून भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झालीय. त्यामुळे उर्वरित 165 वॉर्डासाठी 1 हजार 165 उमेदवार रिंगणात आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने आपला मास्टर प्लॅन तयार केला असून यावेळी पक्ष अत्यंत आक्रमक पवित्र्यात असल्याचे दिसत आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील लाट थोपवण्यासाठी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी भाजपाने यावेळी कोणाचीही गय न करता अनेक जुन्या नगरसेवकांचे पत्ते कट केले आहेत. या निर्णयामुळे पुणे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाने पूर्ण ताकदीनिशी आणि स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करताना पक्षाने भाकरी फिरवण्याचे धोरण अवलंबले आहे. तब्बल 42 विद्यमान नगरसेवकांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. आपल्या कामाच्या जोरावर आणि जनसंपर्काच्या जोरावर पुन्हा निवडून येण्याची खात्री बाळगणाऱ्या अनेक दिग्गजांना पक्षाने मोठा धक्का दिला आहे.