ज्येष्ठांसाठी आधारवड ; “एल्डर लाईन” राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७
xtreme2day
15-09-2025 22:50:03
9034643
ज्येष्ठांसाठी आधारवड ; “एल्डर लाईन” राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७
पुणे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा): "घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे…", "नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय…", "कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही…अशा व्यथा, आणि तक्रारी ज्येष्ठ नागरिक "एल्डर लाईन-१४५६७ या राष्ट्रीय हेल्पलाईनवर मोकळेपणाने व्यक्त करीत आहेत.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ही हेल्पलाईन देशामधील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशात कार्यरत आहे. राज्यात डॉ. विनोद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशन, पुणे या संस्थेमार्फत ही सेवा पुरविण्यात येते.
माहे ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या १४५६७ या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आजवर ४ लाखांहून अधिक कॉल्स आले असून, ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे.
या हेल्पलाईनद्वारे आरोग्य, पोषण, आश्रयगृह, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, कौटुंबिक वाद, मालमत्ता हक्क, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक अधिनियम २००७ याबाबत कायदेशीर सल्ला, मानसिक ताण, नैराश्य, एकटेपणा, राग यावर समुपदेशन, बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांचे पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद, पोलिस प्रशासनाशी समन्वय अशाप्रकारच्या सेवांबाबत मोफतमार्गदर्शन करण्यात येते.
"एल्डर लाईन १४५६७" ही केवळ एक हेल्पलाईन नसून, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात आणि सुरक्षित आधार आहे. वयोवृद्धांना सन्मानाने जगता यावे यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे, हेच या सेवेचे ध्येय आहे. समाजातील गरजू ज्येष्ठांनी या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.