Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

“प्रत्येक संवादात शौर्य, प्रत्येक प्रयोगात देशभक्ती वरील 5000 व्यांदा उजळणार सौमेयात इतिहास”

xtreme2day   11-09-2025 23:36:36   2204407

“प्रत्येक संवादात शौर्य, प्रत्येक प्रयोगात देशभक्ती वरील 5000 व्यांदा उजळणार सौमेयात इतिहास”

अलिबाग (डॉ.जयपाल पाटील ब्युरो चीफ) - शौर्य, त्याग आणि देशभक्ती या मूल्यांचे स्मरण करणे ही केवळ औपचारिकता नसून ती प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचे पालन गेली जवळजवळ 30 वर्षे अखंडपणे करत असलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे जिल्ह्याचे माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप. त्यांनी “शहीद कॅप्टन विनायक गोरे” या एकपात्री नाटिकेच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश सतत जिवंत ठेवला आहे. या नाटिकेचा पाच हजारावा प्रयोग १३ सप्टेंबर रोजी सोमय्या महाविद्यालयात रंगणार असून, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा ठरणार आहे.

 

२६ सप्टेंबर १९९५ रोजी जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेवर केवळ २७ वर्षांचा असलेला कॅप्टन विनायक गोरे यांनी शत्रूंशी लढताना मातृभूमीसाठी बलिदान दिले. या वीराच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि समाजमनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्यासाठी त्याच काळात एनसीसी कॅडेट असलेल्या मनोज सानप यांनी दुसऱ्याच दिवशी, म्हणजे २७ सप्टेंबर १९९५ रोजी आपल्या के.जे. सोमय्या कॉलेजात ही लघुनाटिका प्रथम सादर केली. तेव्हापासून सुरू झालेला प्रवास आज ५,००० व्या प्रयोगापर्यंत पोहोचला आहे.

 

एक साधीशी पंधरा मिनिटांची नाटिका, परंतु त्यातील प्रत्येक संवाद, प्रत्येक नजर, प्रत्येक शब्द अंगावर रोमांच उभा करणारा ठरतो. प्रेक्षकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात, पण ते दु:खाचे अश्रू नसतात, तर आपल्या मातृभूमीबद्दलच्या अभिमानाचे असतात. गेली तीन दशके या नाटिकेच्या माध्यमातून शेकडो शाळांतील विद्यार्थी, हजारो महाविद्यालयीन युवक आणि असंख्य नागरिक यांनी प्रेरणा घेतली. कित्येक युवक सैन्यात दाखल झाले, तर काहींनी रक्तदान, अवयवदान,सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान, ध्वजदिन निधी संकलन, अन्य समाजोपयोगी कार्य अशा विविध मार्गांनी देशसेवा सुरू केली.

 

मनोज सानप यांनी कधीही या प्रवासाला वैयक्तिक लाभाचे साधन बनवले नाही. पुरस्कार, मान्यता किंवा आर्थिक फायद्याची अपेक्षा न ठेवता त्यांनी केवळ राष्ट्रभक्तीची मशाल जिवंत ठेवली. त्यांचा प्रत्येक प्रयोग म्हणजे एक प्रकारे लहानसा समाजजागरणाचा सोहळाच ठरला. आजच्या भौतिकवादाने पछाडलेल्या युगात, सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला या नाटिकेतून मिळणारे संदेश म्हणजे एक प्रकारचे प्राणवायू ठरले आहेत.

 

१३ सप्टेंबर २०२५ रोजी सोमय्या कॉलेजच्या फाउंडेशन डे च्या विशेष सोहळ्यात हा पाच हजारावा प्रयोग सादर होणार आहे. ज्या महाविद्यालयाने आपल्याला संस्कार दिले, त्याच ठिकाणी असा ऐतिहासिक टप्पा गाठण्याचा योग हा स्वतः मनोज सानप यांच्यासाठी अनमोल ठरणारा आहे. यावेळी सभागृहात प्रयोग संपल्यानंतर काही क्षण टाळ्यांचा गजरही थांबणार नाही. उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू तरळतील. त्या क्षणी सगळ्यांच्या मनात एकच भावना असेल – आपल्या वीरांना सलाम, आणि त्यांच्या स्मृती जिवंत ठेवणाऱ्या या कलाकाराला सलाम. हे नक्की!

 

मनोज सानप यांचा पाच हजारावा प्रयोग हा केवळ एका नाट्यप्रयोगाचा टप्पा नाही. तो आपल्या शहीद जवानांच्या त्यागाला वाहिलेली आदरांजली आहे. तो एका कलाकाराच्या अथक जिद्दीचा पुरावा आहे. तो समाजाला योग्य दिशा देणाऱ्या एका शिक्षकाच्या ध्यासाचे प्रतीक आहे. आणि तो एका कृतज्ञ भारतीय नागरिकाची आपल्या मातृभूमीशी असलेली अखंड निष्ठा आहे.

 

आज जेव्हा आपण या प्रवासाकडे मागे वळून पाहतो, तेव्हा केवळ  वाक्य ओठांवर येते,  शहीदांना वंदन, मनोज सानपांना अभिनंदन. कारण त्यांचा हा प्रवास आपल्याला सतत आठवण करून देतो की, देशासाठी प्राण देणे हे जसे महान आहे, तसेच देशासाठी प्रामाणिकपणे जगणे हे त्याहूनही मोठे असे मनोज सानप अभिमानाने सांगतात.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती