xtreme2day 14-08-2025 22:11:59 4503485
सोलापुरात मुसळधार, पावसामुळे शेतात पाणीच-पाणी; शहरापासून गावांचा संपर्क तुटला सोलापूर (विशेष प्रतिनिधी) - मोठ्या पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा गावासह अनेक भागात पुलावर सर्वत्र पाणी आले आहे. अनेक गावांचा सोलापूर शहराशी असलेला संपर्क तुटलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परिश्रमानं जोपासलेल्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी शासनाकडे केली आहे. सोलापुरात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. मागील चार दिवसात दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने सर्वत्र झोडपून काढलं आहे. या पावसामुळे नद्या - नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे अनेक गावात नदी आणि ओढ्यांना पूर सदृश्य परिस्थिती आली आहे. नदी - ओढ्यांवर आलेल्या पुरामुळे बक्षी हिप्परगे ते सोलापूर जिल्ह्यातील वरळेगांव, वडजी आणि मराठवाड्यातील सीमावर्ती भागातील खडकी धोत्री या मार्गाची वाहतूक खंडित झाली आहे. दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावाचा सोलापूर शहराशी असलेला संपर्कही खंडित झाला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणी साचलं असून त्यामुळे खरिपातील तूर, उडीद, सोयाबीन, मुग यासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.