पत्रकार आणि शाहीर एकाच नाण्याच्या दोन बाजू ! चिरतरुण संघात डॉ. शेषराव पठाडे यांचे सप्रयोग व्याख्यान रंगले !!
xtreme2day
04-08-2025 21:18:53
1287724
पत्रकार आणि शाहीर एकाच नाण्याच्या दोन बाजू ! चिरतरुण संघात डॉ. शेषराव पठाडे यांचे सप्रयोग व्याख्यान रंगले !!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) - पत्रकार आणि शाहीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोकमान्य टिळक यांनी लोकपत्रकारिता केली, तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न जीवंतपणे मांडले. दोघेही भारतीय असंतोषाचे जनक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. शेषराव पठाडे यांनी रविवारी, ३ ऑगस्ट रोजी येथे केले.
चिरतरुण ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रमात डॉ. पठाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी चिरतरुण वॉकर्स क्लबचे अध्यक्ष शिवाजीराव रामरूले होते. "भारत माते तुला वंदन करुनी" या गणाने सुरुवात करून डॉ. पठाडे म्हणाले, महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेचा वारसा समृद्ध आणि संपन्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत शाहिरांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. शाहीर अज्ञानदास उर्फ अगीनदास या शाहिराने 'प्रतापगडाचा पोवाडा' रचला आणि मराठी भाषेत पोवाडा हा एक रोमांचकारी काव्यप्रकार म्हणून पुढे रूढ झाला. संशोधक य. न. केळकर यांनी "ऐतिहासिक पोवाडे" हा एक सखोल व विस्तीर्ण ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी शिवकाल तसेच पेशवाईतील ३०० पोवाड्यांचे एकत्रीकरण केले आहे. पोवाडा सादर करताना शाहीर कथानकात एवढे एकरूप होतात की, सभोवतीचे वीरश्रीयुक्त युद्धाचे हुबेहूब वर्णन करून त्यातील बारकावे स्पष्ट करतात. शाहिरांची शब्दकळा, त्यांची देहबोली, आरोह-अवरोह एवढे जबरदस्त असतात की, घटनांचे हुबेहूब चित्र ते नजरेसमोर उभे करतात, हे स्पष्ट करताना शाहीर-पत्रकार डॉ. पठाडे यांनी शाहीर अगीनदास यांचा 'अफजल खानाच्या वधा' चा पोवाडा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची "माझी मैना" ही पोवाडेवजा छक्कड आणि लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पात यांची "वाटलं होतं तुम्ही याल..." या श्रृंगारिक लावणी प्रभावी सादर केली. अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या लावणीतील सौंदर्य स्थळे त्यांनी स्पष्ट केली. "माझी मैना गावाकडे राहिली" ही लावणी तर त्यांनी इतक्या प्रभावीपणे सादर केली की, रसिकांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.
उत्तर पेशवाईतील पठ्ठे बापूराव यांच्या काव्य लेखनाची आणि लावणीची ठळक वैशिष्ट्ये सांगून डॉ. पठाडे यांनी बैठकीतील लावणी व फडातील लावणी यातील मौलिक फरक स्पष्ट केला आणि लावणी हा कलाप्रकार मराठी लोकसंस्कृतीचा कसा अविभाज्य भाग बनला आहे, हे सोदाहरण स्पष्ट केले. शाहीर साबळे, दादा कोंडके यांच्या शाहिरीवरही त्यांनी प्रकाश टाकला. अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत केलेले कार्य इतिहासाला कलाटणी देणारे ठरले आहे. प्रामुख्याने अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, द. ना. गव्हाणकर यांच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला.
प्रारंभी 'चिरतरुण' चे जेष्ठ सदस्य प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि प्रास्ताविकपर भाषण केले. कार्यक्रमाचे आयोजन 'चिरतरुण' चे संघटक विजय जोग यांनी केले, तर अनंत पवार यांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन केले. कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब राऊत यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी डॉ. शिवाजी धनवले, उत्तमराव पवार, गणेश महाजन, रमाकांत शिंदे, जयकुमार भोईरकर, राजाराम साळवे, भारत चौधरी, कासारे पाटील, देठे, इंगळे आदींसह सिडको एन-२ परिसरातील रसिक आणि वॉकर क्लबचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.