खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सवासाठी केदारेश्वर प्रतिष्ठान आणि गुजर मंडळांची एकजूट!
xtreme2day
28-07-2025 18:21:05
1785576
खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सवासाठी केदारेश्वर प्रतिष्ठान आणि गुजर मंडळांची एकजूट!
पिंपरी-चिंचवड (विशेष प्रतिनिधी) - खान्देशाची गौरवशाली परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम असलेला खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२५ यंदा वाल्हेकरवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या भव्य आयोजनासाठी केदारेश्वर प्रतिष्ठान, पुणे, लेवा गुजर समाज मंडळ, गुजर स्नेहवर्धिनी सांगवी, आणि रेवे गुजर समाज मंडळ या प्रमुख संस्थांची एक महत्त्वपूर्ण समन्वय बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.
या उत्सवाचे प्रमुख संयोजक म्हणून नामदेवराव ढाके यांची विशेष भूमिका असणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या बैठकीला केदारेश्वर प्रतिष्ठान, पुणे चे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, अध्यक्ष गिरीधर पाटील, कार्याध्यक्ष मोतिलाल पाटील, सचिव अशोक पटेल, आणि मनोज चौधरी सर उपस्थित होते. तसेच, गुजर स्नेहवर्धिनी सांगवी आणि रेवे गुजर समाज मंडळ यांच्या वतीने अध्यक्ष अजय गुजर, प्रदीप पाटील, जीवन चौधरी, किरण चौधरी, मुकेश देशमुख, आणि गजानन पाटील यांसह अनेक मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थित प्रतिनिधींनी उत्सवाच्या प्रत्येक पैलूवर सखोल चर्चा केली. दिनांक २ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे हा तीन दिवसीय भक्तीमय सोहळा संपन्न होईल. राज्यभरातील कानबाई भक्त या उत्सवात सहभागी होणार असून, मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात हा सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू आहे.
"कानबाई माय, तुनी माया, जशी माले ऊन्हात सावली.
तुना आशीर्वाद, आमना साथी, जगन्याले भेटं नवी पावली."
अशा अहिराणी ओळींनी वातावरणात एक वेगळीच भक्तीमय ऊर्जा संचारली जाते. कानबाई मातेच्या जयघोषाने आणि पारंपरिक गीतांनी वाल्हेकरवाडी परिसर दुमदुमून जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. हा उत्सव खान्देशी संस्कृती आणि एकजुटीचे प्रतीक ठरणार आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.