सेवाकार्यांना साहाय्य करणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य’ ;सेवाभावी संस्थांना कृतज्ञता निधी प्रदान कार्यक्रम
xtreme2day
26-06-2025 17:48:30
2980593
‘सेवाकार्यांना साहाय्य करणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य’ सेवाभावी संस्थांना कृतज्ञता निधी प्रदान कार्यक्रम
पुणे (प्रतिनिधी) - समाजात अनेक सेवाकार्ये सुरू आहेत, त्यातील कोणत्या ना कोणत्या कामाला जोडून घेेणे आणि सेवाकार्यांना शक्य तेवढी मदत करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जे काही ना काही स्वरूपात सेवाकार्य करतात, ते सदैव आनंदात राहतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले.
जनता सहकारी बँकेतील वरिष्ठ अधिकारी संजीव खळदकर यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने अकरा सेवाभावी संस्थांना अकरा लाख रुपयांचा निधी प्रदान केला. या कार्यक्रमात हिरेमठ बोलत होते. खळदकर कुटुंबीयांतर्फे आयोजित या ‘सामाजिक कृतज्ञता निधी प्रदान कार्यक्रमा’त बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, माजी कार्याध्यक्ष हरिभाऊ मिरासदार, अरविंदराव खळदकर आणि संघाच्या पर्वती भागाचे संघचालक अॅड. चंद्रशेखर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजातील दुःख, दैन्य दूर करण्याचे काम अनेक संस्था आणि व्यक्ती सेवाभावनेतून करत आहेत. अशा कामांपैकी अकरा संस्थांची निवड करून त्यांना कृतज्ञतापूर्वक आणि पवित्र भावनेने संजीव खळदकर यांनी निधी प्रदान केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे हिरेमठ म्हणाले. समाजाला आपण किती देतो, यापेक्षाही देण्यामागची भावना महत्त्वाची असते. समाजासाठी काही ना काही देण्याचा संस्कार आपल्या समाजात आहेच. तो अशा कार्यक्रमांमुळे जागृत होतो, असेही त्यांनी सांगितले.
समाजाला उपयुक्त अशी जी सेवाकार्ये सुरू आहेत त्यांना सर्वप्रकारे साहाय्य करणे हे आपले काम आहे. म्हणून दरवर्षी आपल्या उत्पन्नातील ठरावीक रक्कम सेवाकार्यांना द्यावी, जी सेवाकार्ये सुरू आहेत, त्यातील एखाद्या सेवाकार्याला दरवर्षी ठरवून भेट द्यावी आणि आपला काही वेळ सुद्धा एखाद्या सेवाकार्याला द्यावा, असे आवाहन हिरेमठ यांनी केले.
कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालित श्री गुरुजी रुग्णालय, मित्र मंडळ एज्युकेशन सोसायटीचे सरिता विद्यालय, धर्मजागरण ट्रस्ट, कौशिक आश्रम, भोगावती सांस्कृतिक मंडळ, तारळे, जि. कोल्हापूर, सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र, योगी अरविंद सांस्कृतिक मंच, श्री संत सेवा संघ, उमेद फाउंडेशन, अहिल्या मंडळ, पेण, जि. रायगड आणि अब - नॉर्मल होम या अकरा संस्थांना निधी प्रदान करण्यात आला. संजीव खळदकर यांनी मनोगत व्यक्त केले. भूषण करमरकर यांनी सूत्रसंचालन केले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.