Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 छत्रपती संभाजी नगर

प्रखर हिंदुत्व, समरसता, विज्ञाननिष्ठा सावरकरांच्या पत्रकारितेचा आत्मा - प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

xtreme2day   29-05-2025 08:39:31   2189847

प्रखर हिंदुत्व, समरसता, विज्ञाननिष्ठा सावरकरांच्या पत्रकारितेचा आत्मा - प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर                           

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी  - प्रखर हिंदुत्व, समरसता आणि विज्ञाननिष्ठा हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्रकारितेचा आत्मा होय, असे प्रतिपादन माजी कुलगुरू आणि प्रसिद्ध विचारवंत डॉ‌ वि‌. ल. धारूरकर यांनी येथे केले. 

सिडको एन-२ येथे अभाविप सभागृहात सावरकर विचार मंचच्या वतीने आयोजित सावरकर जयंती निमित्त आयोजित "सावरकरांची तेजस्वी पत्रकारिता" या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनवासी कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुवीरजी ओक होते.

    प्रारंभी सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर " ने मजसी ने परत मातृभूमीला.. सागरा प्राण तळमळला" हे गीत संस्कृती कुलकर्णी आणि सारांश ओक यांनी सादर केले. विजय जोग यांनी "गुरुवंद्य महान भगवा एकची जीवनप्राण" हे गीत  प्रभावीपणे सादर केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. रामदास सपकाळ यांनी करून दिला. विजय रसाळ आणि सचिन कोरडे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केले.   

    डॉ. धारूरकर पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शालेय जीवनापासून लेखनाची आवड होती. त्यांनी वृत्तपत्रातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन निबंधांचे लेखन केले व त्यासाठी त्यांना रोख पारितोषिकेही मिळाली होती. सर्व पेशव्यांत श्रेष्ठ पेशवा कोण?, छत्रपती शिवाजी महाराज यांचे क्रांतिकार्य तसेच हिंदुत्व इत्यादी विषयांवर त्यांनी लहानपणीच निबंध लिहिले होते. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात पोहोचल्यानंतर त्यांच्या प्रतिभेला लोकमान्य टिळकांचा परिस्पर्श झाला आणि त्यांनी "केसरी" या वृत्तपत्राचे व्यासपीठ मिळविले. लोकमान्य टिळकांच्या शिफारशीमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन लंडनला बॅरिस्टरचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पोहोचले. तेथे त्यांनी सखोल अभ्यास करून "१८५७ चे स्वातंत्र्यसमर" हा संशोधनपर ग्रंथ लिहिला तसेच त्यांनी "जोसेफ मॅझिनीचे चरित्र" हा ग्रंथही मराठी भाषेत लिहिला. या काळात त्यांनी लंडनमधील वृत्तपत्रात वाचकांची पत्रे लिहिली आणि हिंदी तरुणांचे संघटन केले. लंडनची स्फोटक बातमीपत्रे हा सावरकरांच्या पत्रकारितेमधला एक महत्त्वाचा पैलू होय. सावरकरांनी शि. म. परांजपे यांनी संपादन केलेल्या "काळ" या साप्ताहिकात तसेच फडके यांच्या "विहारी" या साप्ताहिकात लंडनची बातमीपत्रे छापली. या बातमीपत्रांमध्ये इंग्लंडमधील व जगातील परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला आहे. ही बातमीपत्रे वसाहतवादी इंग्रजांचे पूर्णपणे वस्त्रहरण करणारी होती. त्यामुळे इंग्रजांनी स्वातंत्र्य मिळेपर्यंत या बातमीपत्रांवर बंदी घातली होती. त्यामुळे मराठी पत्रकारितेमध्ये बंदी घालण्यात आलेली पहिली बातमीपत्रे म्हणजे लंडनची बातमीपत्रे आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

    पुढे डॉ. धारूरकर म्हणाले, सावरकरांनी रत्नागिरी येथे वास्तव्य असताना आपल्या प्रखर लेखणीतून "हिंदुत्व" हा प्रबंध लिहिला. त्याबरोबरच त्यांनी "मनोहर" आणि "किर्लोस्कर" या मासिकांमध्ये विज्ञाननिष्ठ निबंध लिहिले‌. जर्मन विचारवंत पापर यांचा सावरकरांवर प्रभाव होता. त्यामुळे सावरकरांनी लिहिलेले विज्ञाननिष्ठ निबंध हे मराठी भाषेमधील उत्कृष्ट निबंध आणि पत्रकारितेचा नमुना म्हणून ठरले आहेत. सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ दृष्टीचा ठसा या निबंधांवर उमटला आहे. त्यांनी असे म्हटले होते की, युरोपआदी राष्ट्रे जगावर आज जे राज्य करत आहेत, ती मंत्रबळे नव्हे तर यंत्रबळे. यंत्रबळ हेच खरे मंत्रबळ आहे. सावरकरांनी आपल्या विज्ञानिष्ठ निबंधांतून समाजसुधारणेला गती दिली आणि बुद्धिवादाच्या आधारे सामान्य माणसाला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी येथे असताना त्यांनी पतीत पावन मंदिराची चळवळ चालवली. समरसतेचा पुरस्कार करणारी सहभोजने घडवून आणली आणि जातीप्रथा निर्मूलनासाठी कार्य केले. सावरकरांनी केसरी दैनिकातून संरक्षणाच्या दृष्टीने लेख लिहिले. त्यांची "संरक्षण पत्रकारिता" ही काळाच्या पुढे होती. भारताला चीनपासून धोका आहे आणि चिनी आक्रमणापासून रोखण्यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे सावरकरांनी लिहिले होते. भारताने अनुशक्तीधारी राष्ट्र बनले पाहिजे तसेच भारतीय नौदल, भूदल आणि हवाई दल जगामध्ये पहिल्या क्रमांकाचे सुसज्ज असेल तेव्हा भारत जगातील महासत्ता म्हणून उदयास येईल, असे भाकित त्यांनी त्यावेळी केले होते. सावरकरांचे स्वप्न साकार झाले आहे आणि त्यांच्या हिंदुत्व विचारधारेच्या आधारे देशात परिवर्तन घडून येत आहे. सावरकरांनी लंडनमध्ये असताना द सोअर्ड (तलवार) हे इंग्रजी साप्ताहिक चार वर्षे चालविले तसेच त्यांनी "श्रद्धानंद" या साप्ताहिकितून स्फुटलेखनही केले. अशी सावरकरांची पत्रकारिता समृद्ध संपन्न आणि राष्ट्रवादाच्या स्फुलिंगाला चेतना देणारी होती. पत्रकार या नात्याने सावरकरांच्या कार्याची उपेक्षा झाली असेही डॉ‌. धारूरकर म्हणाले. डॉक्टर धारूरकर यांनी लिहिलेल्या  लिहिलेल्या "क्रांतीसूर्याची विचार वलये" या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन लवकरच होणार आहे. भारताला बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी सावरकरांचे विचार प्रेरक आहेत, असे सांगून त्यांनी धनंजय कीर यांच्या "वीर सावरकर अँड हिज टाइम्स" या ग्रंथाचा उल्लेख केला. धनंजय कीर म्हणतात, सावरकरांना लोकशाही प्रजासत्ताकाच्या आधारे सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करावयाचा होता तसेच शोषणमुक्त कृषी- औद्योगिक समाज घडविणे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी आपल्या वैचारिक धारणेतून भारताला प्रगत विज्ञाननिष्ठ आणि बलशाली राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न केला. सावरकरांची पत्रकारिता म्हणजे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी एक वैचारिक शिदोरी आहे, असेही धारूरकर यांनी सांगितले.

दत्ता घन यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मामाजी बोरा, निवृत्त आरोग्य उपसंचालक डॉ. शिवाजीराव धनवले, राज्य पणन महामंडळाचे निवृत्त व्यवस्थापक अनंत पवार, निवृत्त वैद्यकीय, अधिकारी डॉ. श्याम कुडे, निवृत्त वनाधिकारी गोरख शिरसे. विजय पांगरीकर, निवृत्त कार्यकारी अभियंता जयकुमार भोयरेकर, बाळासाहेब काटे आदी उपस्थित होते. सिडको वॉकर्स क्लबचे अध्यक्ष शिवाजीराव रामरुले यांनी अध्यक्षीय समारोप केला. याप्रसंगी सिडको सावरकर विचार मंचचे मुख्य प्रवर्तक मुकुंद जोशी, सुनील खोचे, शालिवाहन संशोधन मंडळाचे विजय जोग आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
* * * Unlock Free Spins Today: https://basn.aaishahealthedu.org/index.php?4iauyp * * * hs=5a8286892c95616b723001199d66c0fd* ххх* 05-06-2025 23:22:52

zcjxsb

xtreme2day.com
* * * Snag Your Free Gift * * * hs=5a8286892c95616b723001199d66c0fd* ххх* 05-06-2025 23:22:54

zcjxsb

xtreme2day.com
श्रिहारी प्रभाकर आंबेकर 29-05-2025 14:13:54

कार्यक्रम छान होता डॉक्टर धारुल्कर यांनी सावरकर यांचे जीवन डोळ्यासमोर उभं केलं


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती