पारंपरिक भारतीय पदार्थांना जागतिक पातळीवर नेण्याचे जागतिक कीर्तीचे शेफ विष्णू मनोहर यांचे कार्य ; "राष्ट्रसमर्पित कलासाधना" या सांस्कृतिक वार्तापत्राच्या विशेषांकाचे प्रकाशन
पुणे (प्रतिनिधी) - "सांस्कृतिक वार्तापत्रा"च्या कर्वेनगर येथील कार्यालयात विष्णूजी की रसोईचे संस्थापक जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध शेफ,मराठी उद्योजक,दूरचित्रवाणी सूत्रसंचालक विष्णू मनोहर यांनी गुरुवार दि.२० फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक वार्तापत्राने तयार केलेल्या ‘राष्ट्रसमर्पित कलासाधना’ या विशेषांकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर,पुणे महानगर प्रचार मंडळाचे माध्यम आयाम प्रमुख प्रकाश देशपांडे, सांस्कृतिक वार्तापत्राचे संपादक मिलिंद शेटे,व्यवस्थापिका सुनीता पेंढारकर,सह संपादक मेघना घांग्रेकर यांची मुख्य उपस्थिती होती.
‘राष्ट्रसमर्पित कलासाधना’ या अंकात भारतीय कला ज्यातून राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्राप्रतीचा आदर आपल्या कलेतून आपण कसा दाखवला याबद्दल मान्यवर कलाकारांनी आपापले अनुभव सांगितले आहेत.तसेच संबंधित कलेची माहिती सांगून आपली भारतीय संस्कृती इतरांपेक्षा कशी निराळी आहे हे दाखवून दिले आहे.
यातलीच एक कला म्हणजे ‘पाककला’
भारतीय संस्कृतीमधील ‘पाककलेने’ आज संपूर्ण जगात मोठे स्थान निर्माण केले आहे.यात विष्णू मनोहर यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या असलेल्या शेफचा वाटा फार मोठा आहे.आज पारंपरिक भारतीय पदार्थांना जागतिक पातळीवर नेणाऱ्या विष्णू मनोहर यांनी आपले अनुभव सांस्कृतिक वार्तापत्राच्या ‘राष्ट्रसमर्पित कलासाधना’ या विशेषांकात लिहिले आहेत.त्याबाबतचे अनुभव आणि अनुषंगाने मारलेल्या दिलखुलास गप्पा यामुळे त्यांच्या भेटीला रंगत आली.विष्णू मनोहर यांनी सांगितले की नुकतेच ते प्रयागराज येथे महाकुंभास जाऊन आले.तेथे त्यांनी ११,००० किलोचा (शिरा) प्रसाद तयार केला.हा त्यांचा २८ वा विश्वविक्रम आहे यापूर्वी त्यांनी अयोध्या येथे जाऊन सात हजार किलोचा राम हलवा तयार केला होता.विशेष नमूद करण्यासारखे म्हणजे त्यांनी त्यांच्या ‘विष्णूजी की रसोई’च्या सर्वच शाखांमध्ये (अमेरिकेत असलेल्या शाखेत सुद्धा) डॉक्टर हेडगेवार,पू.गोळवलकर गुरुजी,स्वा.विनायक दामोदर सावरकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा आवर्जून लावल्या आहेत.
सांस्कृतिक वार्तापत्राचे संपादक मिलिंद शेटे यांनी त्यांचा फोटो फ्रेम देऊन सन्मानित केले तर व्यवस्थापिका सुनीता पेंढारकर यांनी विष्णू मनोहर यांना 'युगप्रवर्तक डॉ.हेडगेवार' अंक दिला.
प्रकाशन कार्यक्रमानंतर कार्यालयात आणलेल्या पुरणपोळी आणि बटाटेवड्याचा आस्वाद त्यांनी घेतला आणि विशेष म्हणजे बटाटेवड्याचे खास कौतुक केले.ज्यांनी हे पदार्थ तयार केले त्यांच्याबरोबर चर्चा केली व प्रशंसा केली.उपस्थित सर्वांशी आपुलकीने गप्पा मारल्या.त्यात त्यांनी विशेषांकातील सर्व लेखांचे व लेखकांचे कौतुक केले."सर्वांनी आवर्जून असा हा अंक जरूर वाचावा व विकत घ्यावा "असे आवाहनही त्यांनी केले. विष्णू मनोहर यांची भेट सर्वांसाठीच उत्साहवर्धक व प्रेरणादायी ठरली.
फोटो - राष्ट्रसमर्पित कलासाधना विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी जागतिक कीर्तीचे शेफ विष्णू मनोहर,मिलिंद शेटे,दिलीप क्षीरसागर,प्रकाश देशपांडे,सुनीता पेंढारकर,मेघना घांग्रेकर