देशपातळीवर संगणकीय उपक्रम पूर्ण करणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील पहिली बँक ; ओरिसा भुवनेश्वर येथे राष्ट्रीय बहुमान देणार
xtreme2day
26-09-2024 20:03:15
1987788
देशपातळीवर संगणकीय उपक्रम पूर्ण करणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील पहिली बँक ; ओरिसा भुवनेश्वर येथे राष्ट्रीय बहुमान देणार
अलिबाग (डाँ.जयपाल पाटील यांजकडून) - केंद्रीय सहकार मंत्रालय आणि नाबार्ड यांच्या संयुक्त पुढाकाराने सुरू झालेली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था यांच्या संगणकीकरणाची मोहीम रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पूर्ण केलेली असून त्याचे सादरीकरण ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्याद्वारे ओरिसा राज्यात भुवनेश्वर या ठिकाणी केले जाणार आहे. विशेष म्हणजे देशपातळीवर हा उपक्रम पूर्ण करणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील पहिली बँक ठरली आहे.
या कार्यक्रमासाठी नाबार्डचे अध्यक्ष के.व्ही.शाजी, केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मुख्य सचिव आशीष कुमार भुतानी , महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, नाबार्ड महाराष्ट्र विभाग कार्यालयाच्या प्रमुख रश्मी दराड, सर्व राज्यांचे सहकार सचिव ,आयुक्त , नाबार्डचे वरिष्ठ अधिकारी आणि देशापातळीवरील सहकार विषयाचे प्रमुख अभ्यासक यावेळी उपस्थित राहणार आहेत. रायगड जिल्हा बँकेने केलेले काम हे उल्लेखनीय असून राज्यातील इतर सहकारी बँकांनी देखील त्याची प्रेरणा घेऊन काम करावे असे कौतुक राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे याच्या वतीने करण्यात आले.
संपूर्ण भारतामधील ६२,३१८ विविध कार्यकारी सहकारी संस्थांना अधिक सक्षम आणि व्यवसायभिमुख बनविण्याच्या दृष्टीकोणातून या सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्याचा अभिनव प्रकल्प केंद्रीय सहकार मंत्रालय यांच्यावतीने सुरू करण्यात आला आहे. यामध्ये भारतातील २८ राज्ये आणि सर्व केंद्रशासित प्रदेश समाविष्ट आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हा प्रकल्प वेळेच्या आधीच पूर्ण करून संगणकीकरणामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
यामध्ये बँकेचे चेअरमन जयंत पाटील आणि सर्व संचालक यांनी केलेले मार्गदर्शन आणि घेतलेला पुढाकार तसेच बँकेच्या सर्व कर्मचार्यांनी दिलेले योगदान आणि विशेष म्हणजे सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या संचालक आणि अध्यक्ष यांनी दाखविलेली मानसिकता यामुळे हा उपक्रम पूर्ण करण्यात बँकेला यश मिळाले आहे अशी प्रतिक्रिया बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन , जिल्हा सहकारी उपनिबंधक, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक, लेखा परीक्षणविभाग ,जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निबंधक यांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच देशपातळीवर बँकेचा हा गौरव केला जाणार असून हा संपूर्ण राज्याचा आणि जिल्ह्याचा बहुमान असणार आहे असेही मंदार वर्तक यांनी सांगितले.
बँकेने केलेल्या सर्वोत्तम कामासाठी ही निवड झालेली असून याअगोदर देखील बँकेने २०१३ साली किसान डेबिट कार्ड आणि मोबाईल एटीएम व्हॅन हे उपक्रम देशपातळीवर पहिल्यांदा पूर्ण करणारी बँक म्हणून देशपातळीवर आपली ओळख निर्माण केली होती ,संस्था संगणकीकरणामुळे बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा खोवला जाणार असून बँकेच्या या कामगिरीबद्दल नाबार्ड महाराष्ट्राच्या प्रमुख सीजीएम रश्मी दराड यांनी बँकेचे कौतुक केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.