बँकेचा व्यवसाय 10,000 कोटींवर नेण्याचा मानस: शेतकर्यांना आधुनिकरित्या सक्षम करण्यावर भर ; रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील
xtreme2day
25-08-2024 20:42:40
984703
बँकेचा व्यवसाय 10,000 कोटींवर नेण्याचा मानस: शेतकर्यांना आधुनिकरित्या सक्षम करण्यावर भर ; रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील
अलिबाग (डॉ.जयपाल पाटील) - रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन बँकेच्या केंद्र कार्यालयात करण्यात आले होते. या सभेत बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बँकेच्या व्यवसायाचे उद्दिष्ट 10,000 कोटी रुपयांवर नेण्याचा मानस व्यक्त केला तसेच या आर्थिक वर्षात बँकेने 73 कोटीपेक्षा अधिक ढोबळ नफा कमाविलेला असून त्याचे श्रेय ग्राहकांचे असून यातूनच शेतकर्यांना अधिक सक्षम बनविण्याच्या दिशेने बँकेच्या धोरणांचा विस्तार कसा होईल, यावर अधिक भर दिला जाणार असल्याचे नमूद केले. याशिवाय बँक मीनाक्षी ड्रोन योजना राबवणार आहे असेही स्पष्ट केले आहे.
या वार्षिक सभेत उपाध्यक्ष सुरेश खैरे, शंकराव म्हात्रे, बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक बँकेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी आपल्या मनोगतात शेतकर्यांना यांत्रिकीकरणाद्वारे अधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न आहे, विशेषतः फळ पिकांवर होणारी फवारणी ड्रोनद्वारे करणे गरजेचे आहे, आणि त्यासाठी शासनाकडून सबसिडी उपलब्ध आहे. या अनुषंगाने बँक मीनाक्षी ड्रोन योजना राबवणार आहे, ज्यासाठी बँकेद्वारे सर्व शेतकर्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली, यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अधिक आधुनिक होऊन त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील.
शेतीला संजीवनी आणि औद्योगिकीकरणाशी तडजोड :
जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शेतीला लागणारी जमीन कमी होत चालली आहे, परंतु या परिस्थितीतही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बँकेचे विशेष प्रयत्न राहतील. आंबा आणि काजू यांसारख्या पारंपरिक पिकांची लागवड अधिक प्रभावी बनवण्यासाठी बँक विविध योजना राबवणार आहे. डोंगराळ भागात कमी पाण्याची उपलब्धता असतानाही उच्च प्रतीचे पिक घेण्यासाठी बँकेच्या यंत्रणेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
सतत प्रगती आणि नवनवीन धोरणे
बँकेचे कामकाज अधिक गतीमान करण्याचा मानस असल्याचे बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी आणि त्यांच्या टीमने चांगले काम केले आहे, आणि त्यामुळे बँकेचा व्यवसाय 6000 कोटींवर पोहोचला आहे. लवकरच तो 10,000 कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. बँकेचा ग्रॉस एनपीए शून्य टक्के राहिला पाहिजे,यासाठी आम्ही अधिक चांगले प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.
बँकेच्या यशामध्ये कर्मचार्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांना योग्य ते प्रोत्साहन बँक देणार असून सभासदांना साडेबारा टक्के डिव्हीडंट यावेळी घोषित करण्यात आला.
अनेक कर्तृत्ववानांचा सन्मान
सभेच्या वेळी विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. संस्था संगणकीकरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्र कार्यालय अलिबागचे योगेश पाटील, पेण शहर शाखेचे राकेश पालकर, रोहा शाखेचे वैभव पाटील, म्हसळा शाखेचे विजय पयेर, पाली शाखेचे प्रशांत जोशी, उरण शाखेचे रुपेश म्हात्रे यांचा गौरव करण्यात आला. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये बेलोशी, पाच्छापूर, पोलादपूर, कामार्ली, नांदगाव आणि चणेरा सहकारी संस्थांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रपती पदकास पात्र ठरलेले व पर्यटकांचा जीव वाचवणारे पोलिसांचा सन्मान
उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, विनीतकुमार चौधरी, पोलीस निरीक्षक शिवाजी जुंदरे, या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांना विशेष पदक आणि पोलीस हवालदार चेतन वेळे यांनी मागील आठवड्यात मुरुड समुद्रकिनारी पाच नागरिकांचा जीव वाचवील्याबद्दल त्यांचा सन्मान बँकेच्या करण्यात आला.
बँकेच्या पेण शहर शाखेच्या एटीएममध्ये बनावट कार्ड वापरून पैसे काढणाऱ्या चोरांना पकडून देणारे अकाऊंटट मिलींद पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कर्ज विभागाचे उत्कृष्ट काम करणारे उपमुख्य व्यवस्थापक सुरेश नागे, अकाऊंट विभागातील इन्कम टॅक्स विभागात अग्रेसर काम केल्याबद्दल उपमुख्य व्यवस्थापक गजानन हावरे, कोअर बँकींगमधील हार्डवेअर अपग्रेड सेक्युरिटीची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे उपव्यवस्थापक प्रतिक बना, क्लिअरिंग विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणारे उपव्यवस्थापक मनिष पडवळ, आयटी विभागातील सर्व आधुनिक सेवा पाहणारे संकेत राऊळ यांचाही सन्मान करण्यात आला. ठेवी संकलन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, खोपोली, नेरळ, देवीचापाडा, कामोठे, चौक, आणि कळंबोली शाखांच्या अधिकार्यांचा व त्यांच्या टीमचा गौरव करण्यात आला.
सभेचे सूत्रसंचालन सिनियर मॅनेजर संदीप जगे यांनी केले,, यासभेकरिता जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था आणि त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.