राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात शिरूर तालुक्यात गावठी दारुसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
xtreme2day
08-05-2024 16:55:32
98533
राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात शिरूर तालुक्यात गावठी दारुसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे (प्रतिनिधी) - राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने माहिती मिळाल्यानुसार शिरूर तालुक्यातील आपटी गावाच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात १ हजार २० लीटर गावठी दारु, २ हजार लीटर रसायनासह चारचाकी वाहन असा ६ लाख २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने आजपर्यंत अवैध गावठी दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच अवैधपणे मद्य विक्री करणारे हॉटेल, ढाबे, अवैध ताडी विक्री आदींवर कारवाई करून एकूण ८३ गुन्हे नोंद केले आहेत. या गुन्ह्यांत २ हजार ८६४ गावठी दारू, ४३ हजार ७०० लीटर रसायन, २४७ लीटर देशी दारू, १६४ लीटर विदेशी मद्य, २०१ लीटर बीअर व ८ वाहने असा ४९ लाख ९९ हजार १९५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोंपीविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या तरतुदीनुसार गुन्हे नोंद केलेले आहेत.
वरील कारवाई पुणे पथकाचे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, संदेश तडवळेकर, कुलभूषण पाटील, अनिता तनपुरे, प्रियंका पानसरे, हेमा खुपसत, डी. एस. कुलकर्णी, जवान सुरज घुले, जयराम काचरा, मुकुंद पोटे, शरद हांडगर, प्रमोद पालवे, चंद्रकांत नाईक, महिला जवान शाहीन इनामदार, वंदना मारकड, अनिता नागरगोजे यांच्या पथकाने पार पाडली.
अवैध मद्य निर्मिती, विक्रीबाबत कोणास माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक देवदत्त पोटे यांनी केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.