जागतिक ग्रंथदिन व आईच्या स्मरणार्थ पत्रकार हनुमंत देवकर यांचेकडून खराबवाडी शाळेला ७५ हजारांचे ग्रंथदान...
xtreme2day
26-04-2024 23:15:19
79073
ग्रंथ जीवन जगण्याची प्रेरणा देतात : हभप. चैतन्यमहाराज थोरात
जागतिक ग्रंथदिन व आईच्या स्मरणार्थ पत्रकार हनुमंत देवकर यांचेकडून खराबवाडी शाळेला ७५ हजारांचे ग्रंथदान...
चाकण : "ग्रंथ हे दैनंदिन जीवनातील वाटाडे असून ते आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देतात. आपण आपल्या जीवनात नीतीने वागावे. आपल्या गुरूंवर निष्ठा ठेवावी, जीवनात जगायचे कसे हे आपल्याला ग्रंथ शिकवतात. त्यासाठी ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचावीत. मनापासून पुस्तके वाचली तर जीवनातील समस्या दूर होतील." असे प्रतिपादन बाल कीर्तनकार हभप. कु. चैतन्यमहाराज थोरात यांनी केले.
खराबवाडी ( ता. खेड ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक ग्रंथदिनानिमित्त संतभारती ग्रंथालय आयोजित व्याख्यान, ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ प्रदान सोहळ्यात ते विद्यार्थ्यांना 'ग्रंथ हेच गुरु' या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.
खराबवाडी जिल्हा परिषद शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाळेचे माजी विद्यार्थी, संतभारती ग्रंथालयाचे अध्यक्ष, पुणे जिल्हा ग्रंथालयाचे उपाध्यक्ष, पत्रकार हनुमंत देवकर यांनी आपली आई स्व. गजराबाई ज्ञानोबा देवकर यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जागतिक ग्रंथदिनाचे औचित्य साधून आपले शिक्षक व शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक गुरुवर्य भिकाजी गणपत पानसरे गुरुजी आणि महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये यांच्या हस्ते शाळेच्या ग्रंथालयासाठी ७५ हजार रुपयांची पुस्तके भेट दिली. याप्रसंगी शाळेत ग्रंथ प्रदर्शन भरवून उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी निवृत्त मुख्याध्यापक भि. ग. पानसरे गुरुजी म्हणाले, "खराबवाडी शाळेत वीस वर्षे सेवा केली. त्यावेळी विद्यार्थी आणि पालकांमध्ये समरस झालो. अनेक विद्यार्थी घडविले. माझा विद्यार्थी हनुमंताने आईच्या स्मरणार्थ व शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेला ७५ हजार रुपयांचे ग्रंथदान करून ग्रंथालय उभारणीसाठी केलेली मदत अतिशय स्तुत्य आहे."
यावेळी आपल्या विद्यार्थ्याने राबविलेल्या उपक्रमाबद्दल पानसरे गुरुजी यांनी देवकर यांना पाच हजाराची रोख रक्कम भेट दिली असता मिळालेली रक्कम देवकर यांनी याच कार्यक्रमात पुस्तकांच्या कपाटासाठी शाळेला भेट देऊन मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केली.
महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये म्हणाले, "मुलांमध्ये थोर पुरुषांबद्दल जागरूकता निर्माण करावी. जीवनात मोठं व्हायचं असेल तर पुस्तके वाचा, खूप अभ्यास करा व आई वडिलांचा आदर करा."
यावेळी हनुमंत देवकर म्हणाले, "मुलांवर लहानपणीच संस्कार व्हायला पाहिजे. त्यासाठी वाचनाची आवड जोपासावी. ज्ञान हे ग्रंथातून मिळते. म्हणून मुलांनी पुस्तकांशी मैत्री करावी." त्यांनी शालेय जीवनातील आठवणी ते ग्रंथालय उभारणी करताना आलेल्या समस्या व अनुभव कथन केले.
यावेळी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक भिकाजी पानसरे गुरुजी, महाळुंगे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष जायभाये, मुख्याध्यापक राजेंद्र कातोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण किर्ते, उपाध्यक्ष ॲड. अमर वाघ, संचालक तेजस वाडेकर, ज्ञानेश्वर मोकाशी, संतोष खराबी, रुपेश खेडकर, शांताराम घोलप, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. धर्मा नवले यांनी सूत्रसंचालन केले, तर संतोष भुते यांनी आभार मानले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.