मी उमेदवार आहे, माझ्याशी थेट बोला ! वडिलांवर काय टीका करता ; काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सातपुतेंवर कडाडल्या
xtreme2day
29-03-2024 20:26:09
1437093
मी उमेदवार आहे, माझ्याशी थेट बोला ! वडिलांवर काय टीका करता ; काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सातपुतेंवर कडाडल्या
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरद पवार पक्षाच्या मेळ्याव्यात सोलापूर लोकसभेचे उमेदवार मा. प्रणिती शिंदेंना मोठ्ठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार
सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून मी उभा राहिलेले आहे. सुशीलकुमार शिंदे साहेब नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर भिडायचं असेल तर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून माझ्यासोबत भिडा, माझ्या वडिलांवर काय आरोप करताय, अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर वडाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे, तालु्का अध्यक्ष प्रल्हाद काशिद, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष शालिवाहन देशमुख, शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*यावेळी बोलताना बळीराम काका म्हणाले की, आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उस्फुर्तपणे प्रचारात सहभागी व्हावे, तसेच आपल्या संपर्कातील पाहुणे, मित्र, ग्रामस्थ या सर्वांनी मोठ्या मताधिक्यांने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून द्यावे. यासाठी पुढील काही दिवस प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी गावोगावात पोहोचून प्रचार करण्याचे आवाहनही यावेळी काकांनी केले.*
माझ्यासोबत भिडा..
आमदार शिंदे म्हणाल्या, माता जिजाऊ, अहिल्यादेवी यांचे संस्कार घेऊन सुप्रिया सुळे आणि मी भाजपसारख्या शत्रू विरोधात लढत आहोत. दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे साहेब आणि शरद पवार साहेब वयाच्या 83 व्या वर्षी लोकशाही संपवायला निघालेल्या भाजपच्या विरोधात खंबीरपणे लढा देत आहेत. असे असतानाही भाजपकडून त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हे दोन्ही ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढा देत असताना भाजपकडून त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत यातून त्यांचे संस्कार दिसत असल्याची टीका यावेळी शिंदे यांनी केली आहे.
भाजपचे जे उमेदवार माझ्या विरोधात उभे राहिले आहेत त्यांना जनता पार्सल असे संबोधते, असा टोलाही त्यांनी राम सातपुते यांचे नाव न घेता लगावला. तसेच निवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून उभी आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माझ्याशी भिडा, वडिलांवरती काय आरोप करता? आणि ज्या माणसाने सोलापूरकरांसाठी संघर्ष केला तो अवघ्या सोलापूरकरांना माहिती आहे तर तुम्ही त्यांना कसले प्रश्न विचारता? निवडणुकीत मी उमेदवार आहे. तुम्ही माझ्या कामाबाबत बोला, मी लोकांची कामे केली म्हणूनच आमदार झाले, तो पण एक संघर्ष होता. तर जर तुम्ही त्याला संघर्ष मानत नसाल तर तो माझ्या मतदारसंघातील मतदारांचा अपमान असल्याचे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवारावर जोरदार हल्लाबोल केला.
ही निवडणूक लढवण्यासाठी भाजप उमेदवारांकडे कोणते मुद्देच नाहीयेत गेल्या दहा वर्षात त्यांनी कोणतेही विकासाचे काम केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याची टीकाही आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली. भाजपकडून मागील दहा वर्षात केवळ फसवी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही. मात्र यावेळी आपल्याला लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायच्या आहे असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी केले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.