Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 बीड

अजितदादांना दुसरा धक्का, निलेश लंकेंमागोमाग बीडच्या बजरंग सोनवणेंनी साथ सोडली, पंकजा मुंडेंना लोकसभा अवघडचं !

xtreme2day   20-03-2024 12:26:11   1846773

अजितदादांना दुसरा धक्का, निलेश लंकेंमागोमाग बीडच्या बजरंग सोनवणेंनी साथ सोडली,  पंकजा मुंडेंना लोकसभा अवघडचं !

 

बीड (प्रतिनिधी) - बीडमधून अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.  अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बीडच्या बजरंग सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून सोनवणेंनी पक्षाला रामराम ठोकला आहे. सोनवणे लवकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. निलेश लंकेंपाठोपाठ अजितदादांसाठी हा दुसरा मोठा हादरा मानला जात आहे.

 

बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनवणे हे शरद पवार गटात गेल्यास भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढणार आहे. पक्षातील फुटीनंतर सोनवणे अजितदादांबरोबर होते, मात्र त्यांनी आता शरद पवारांकडे घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
दरम्यान, बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवावी, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. महायुतीत बीडची जागा भाजपकडे आहे. भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत त्यांच्या भगिनी आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
 
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांच्याविरोधात रिंगणात उडी घेतली होती. राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली होती. प्रीतम मुंडेंना ६ लाख ७८ हजार १७५ मतं मिळाली होती. तर सोनवणेंना ५ लाख ९ हजार ८०७ मतं पडली होती. म्हणजेच बीडमध्ये कोणे एके काळी विक्रमी मतांनी विजयी झालेल्या मुंडेंना १ लाख ७० हजारांचीच लीड मिळाली होती. त्यामुळे सोनवणेंचं बळ शरद पवार गटाला लाभल्यास पंकजांवर टांगती तलवार राहणार आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती